सातारा : दै. ‘पुढारी'च्या संचालिका व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून त्यांना पक्षाने पुणे विधान परिषद पदवीधर मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली. त्यानिमित्ताने सातार्यात शिवतीर्थ येथे भाजप पदाधिकार्यांसह सातारकरांनी जोरदार जल्लोष केला. डॉ. स्मितादेवी यांना उच्चांकी मतदानाने निवडून आणू, असा निर्धार सातारा भाजपने यावेळी केला.
डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांचा भाजप प्रवेश व पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्याने सातारा शहरासोबत जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप पदाधिकारी व सातारकरांनी रविवारी सायंकाळी शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत जोरदार जल्लोष केला. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, बांधकाम व्यावसायिक दिपक पाटील, काका धुमाळ, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, भाजपचे गटनेते अविनाश कदम, भाजप सातारा शहर बाह्य मंडल अध्यक्षा वैशाली टंगसाळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व आरोग्य सभापती धनंजय जांभळे, शिक्षण सभापती शंकर किर्दत आदि प्रमुख उपस्थित होते.
यावेळी अमोल मोहिते म्हणाले, स्मितादेवी जाधव यांना पदवीधर मतदारसंघातून निवडून आणण्याची जबाबदारी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांसह भाजपच्या पदाधिकार्यांची आहे. डॉ. स्मितादेवी जाधव यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वारसा लाभला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून त्या नक्की निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विठ्ठल बलशेटवार म्हणाले, डॉ. स्मितादेवी जाधव या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू असून त्यांनी मोठे शैक्षणिक कार्य केले आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांना पदवीधरांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळत असल्याने आनंद होत आहे.
अविनाश कदम म्हणाले, भाजपाने यथोचित सन्मान करत डॉ. स्मितादेवी जाधव यांना पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. हा निर्णय सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. डॉ. स्मितादेवी जाधव या शैक्षणिक कार्यासोबतच जनसामान्यांत मिसळणार्या आहेत. दै. 'पुढारी' तसेच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. पदवीधरांच्या मागण्यांना त्यांच्या माध्यमातून न्याय मिळेल.
वैशाली टंगसाळे म्हणाल्या, भाजपने डॉ. स्मितादेवी जाधव यांची पदवीधर मतदारसंघासाठी योग्य निवड केली आहे. त्यांचे शैक्षणिक योगदान मोठे असून शैक्षणिक क्षेत्राचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. भाजपची संपूर्ण टीम त्यांचे काम करणार आहे.
दरम्यान, शिवतीर्थावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम्, स्मितादेवी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणांनी शिवतीर्थ दणाणून गेले. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
यावेळी नगरसेवक दिलीप म्हेत्रे, सचिन पाटोळे, माजी नगराध्यक्ष नासीर शेख, बाळासाहेब इथापे, जिल्हा संवादक प्रविण शहाणे, विक्रम बोराटे, सचिन कांबळे, सातारा शहर मध्य मंडल अध्यक्ष अविनाश खरशीकर, अमर बेंद्रे, विक्रांत भोसले, मनोज पवार, सिद्धार्थ तीखे, भाजप नगरसेवक, पदाधिकारी, सातारकर उपस्थित होते.