मेढा : बिभवी, ता. जावली येथील पाच घरे आगीमध्ये जळून खाक झाली. या भीषण घटनेत संसारोपयोगी साहित्य बेचिराख झाले असून, घरात असणाऱ्या दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगडोंब उसळला. या प्रकाराने परिसरात घबराट निर्माण झाली.
बिभवी येथील पांडुरंग शंकर कदम, विठ्ठल शंकर कदम, वसंत शंकर कदम, दत्तात्रय सावळाराम कदम, प्रभाकर सावळाराम कदम यांच्या घरांना सोमवारी आगीने वेढले. सकाळी 9 वा. अचानक धुराचे लोट पत्र्यामधून बाहेर पडताना दिसू लागले. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. यादरम्यानच घरात असणाऱ्या दोन सिलेंडरचा स्फोट झाला. कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने परिसर भेदरून गेला. या स्फोटामुळे आग आणखी फैलावली. संबंधीत कुटुंबिय बाहेरगावी गेले होते. आगीची घटना निदर्शनास येताच गावकऱ्यांनी त्यांना बोलावून घेतले. तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतू आग मोठ्या प्रमाणात फैलावल्याने आटोक्यात येत नव्हती. अग्नीशमन दलाला फोन करून तात्काळ बोलावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत घरातील सर्व धान्य, कपडे, व इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे या कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला.