वेळे : भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील देगाव, भुईंज, आसले, जोशी विहीर, ओझर्डे, धनगरवाडी, बदेवाडी, बोपर्डी परिसरात डेंग्यूची साथ पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात आतापर्यंत सुमारे २५० संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यातील काही रुग्ण खासगी, तर काही शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांतून मोठ्या संख्येने नागरिक गावाकडे आले होते. गणेशोत्सव संपल्यानंतर परिसरात ताप, अंगदुखी, अशक्तपणा यांसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले. त्यातच परतीचा पाऊस आणि बदललेल्या वातावरणामुळे विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मोठ्या संख्येने संशयित रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. नागरिकांकडून ताप अथवा डेंग्यूची लक्षणे जाणवताच तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परिसरात डासांची उत्पत्तीस्थळे निर्माण होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी घराभोवती पाणी साचू देऊ नये, अशी सूचनाही आरोग्य विभागाने केली आहे. डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने या भागातील गावागावात अंगणवाडी सेविका आणि आशांद्वारे सर्वे केला जात आहे. भुईंज आरोग्य केंद्र व वाई ग्रामीण रूग्णालयात सुविधा अपुर्या असल्याने अनेकांनी खासगी रूग्णालयात उपचार सुरू केले आहे.
दरम्यान, डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आशा सेविकांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत असून, संशयित रुग्णांची माहिती संकलित केली जात आहे. डेंग्यूची साथ रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, एक कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांमुळे तसेच त्यानंतर बदललेल्या वातावरणामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याची शक्यता आहे. भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, आशा सेविकांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे.डॉ. विनय भोईटे, तालुका वैद्यकीय अधिकारी