भोसे येथे ऊसतोडणी मजुराचा खून 
सातारा

Satara Crime : भोसे येथे ऊसतोडणी मजुराचा खून

संशयिताचा विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पळशी : कोरेगाव तालुक्यातील भोसे परिसरात ऊसतोडणी मजुराचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. जरंडेश्वर शुगर मिलमध्ये चिट बॉय म्हणून कार्यरत असलेल्या युवकानेच हा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. कोरेगाव पोलिसांनी त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. यानंतर संशयित अजय माने यानेही विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मच्छिंद्र अंबादास भोसले (वय 42, रा. उखळवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे खून झालेल्या मजुराचेे नाव आहे. तर अजय राजेंद्र माने (रा. भोसे, ता. कोरेगाव) असे संशयित चिटबॉयचे नाव आहे. याप्रकरणी गोरखनाथ अंबादास भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मच्छिंद्र भोसले हे गेल्या काही वर्षांपासून ऊस हंगामात जरंडेश्वर कारखान्यासाठी काम करत होते. यंदाही ते पत्नी व कुटुंबासह बीडहून चिमणगाव, ता. कोरेगाव येथे आले होते. या प्रकरणातील संशयित अजय माने हा जरंडेश्वर शुगर मिलमध्ये चिट बॉय म्हणून कार्यरत आहे. पोलिस तपासानुसार, दि. 15 जानेवारी रोजी रात्री अजय माने याने मच्छिंद्र भोसले यांना जेवणासाठी जात असल्याचे सांगून आपल्या शेतात नेले. तेथे दोघांमध्ये झालेल्या वादातून अजय माने याने मच्छिंद्र भोसले यांच्या डोक्यात दगडाने मारून त्यांचा खून केल्याचा संशय आहे. घटनेनंतर संशयिताने मृतदेह शेतातच टाकून दिला. खून केल्यानंतर संशयित माने याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्याला तातडीने कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, मच्छिंद्र भोसले हे घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने दि. 17 रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असता मंगळवारी सकाळी अजयचे वडील राजेंद्र माने शेतात गेले असता तेथे मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने पोलीस पाटील व पोलिसांना घटनेची माहिती दिली. सपोनि प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहाची ओळख पटवून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तपासादरम्यान संशयाची सुई संशयित अजय माने याच्यावर केंद्रित झाल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. आरोपी सध्या उपचार घेत असल्याने खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती जरंडेश्वर शुगर मिल परिसरासह बीड जिल्ह्यात वेगाने पसरली आहे. मृताच्या नातेवाईकांनी कोरेगावकडे धाव घेतली आहे. संभाव्य तणाव लक्षात घेता कारखाना परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT