Satara Illegal Mining  
सातारा

Satara Illegal Mining : भोसेतील अनधिकृत उत्खननाला प्रशासनाचा दणका

२० लाख ४३ हजारांचा दंड; अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले

पुढारी वृत्तसेवा

पाचगणी : पाचगणी ते महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरील भोसे (ता. महाबळेश्वर) येथील सर्व्हे नंबर २६ मध्ये झालेल्या अनधिकृत उत्खनन प्रकरणात महसूल प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. निवृत्त पोलिस अधिकारी इसाक बागवान यांच्या नावाशी संबंधित जमिनीवर नियमांचे उल्लंघन करून केलेल्या उत्खननाप्रकरणी २० लाख ४३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

भोसे परिसरातील डोंगराळ भागात झालेल्या उत्खननामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल विभागाने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून उत्खननाची व्याप्ती आणि स्वरूप तपासण्यास सुरुवात केली होती.

या प्रकरणात शेतीपूरक व्यवसायासाठी परवानगी घेतल्याचा दावा केला जात असला, तरी संबंधित जागा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने तेथे उत्खननास परवानगी नसल्याचे तहसीलदार सचिन मस्के यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे नेमकी कोणत्या स्वरूपाची परवानगी घेतली होती आणि प्रत्यक्षात कोणत्या प्रकारचे काम झाले, याबाबत प्रश्‍न उपस्थित झाले होते. बागवान यांच्या नावाशी संबंधित या प्रकरणामुळे पाचगणीच्या पर्यावरणाचा प्रश्‍न पुन्हा चर्चेत आला .

या प्रकरणाची व्याप्ती आणि प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी तहसीलदार मस्के यांनी घटनास्थळी पुन्हा भेट देत पाहणी केली. यावेळी प्रत्यक्ष उत्खनन झालेल्या जागेची फुटपट्टीच्या मदतीनेे मोजमापे केली. उत्खननाची लांबी, रुंदी आणि खोली तपासून नव्याने पंचनामा झाला.

भोसे येथील उत्खनन प्रकरणाची महसूल विभागाकडून गांभीर्याने तपासणी केली आहे. संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी करून नव्याने पंचनामा केला. संबंधित जागा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने तेथील उत्खननाबाबत पर्यावरणीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना दंड ठोठावला. परिसरात यापुढेही अनधिकृत उत्खनन आढळल्यास कठोर कारवाई होईल.
- सचिन मस्के, तहसीलदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT