पाचगणी : इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचा आधार घेत सर्वसामान्य स्थानिक नागरिकांना नोटिसा बजावणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेवर आता भोसे, ता. महाबळेश्वर येथील उत्खननामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली स्थानिकांना नियमांची जाणीव करून दिली जात असताना दुसरीकडे पाचगणी–महाबळेश्वर मुख्य रस्त्यालगत भोसे हद्दीत भरदिवसा अवैध उत्खनन केले जात आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
भोसेच्या हद्दीतील सर्व्हे क्रमांक २६ मधील जागेवर मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून जमिनीचे स्वरूप बदलले जात आहे. डोंगराळ भागातील मातीचे खोदकाम करणे, जमिनीची उंची कमी करणे आणि नैसर्गिक उतारामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्खननासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या घेतल्या आहेत का? किती ब्रास उत्खनन करण्यात आले? त्यासाठी महसूल विभागाची रितसर परवानगी आहे का? पर्यावरणविषयक नियमांचे पालन करण्यात आले आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुंबई अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड मन्या सुर्वे याच्या एन्काऊंटरशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेवर हे उत्खनन सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. तरी संबंधित जागेची मालकी, उत्खननाच्या परवानग्या आणि प्रत्यक्ष कामाची व्याप्ती याबाबत महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. महसूल विभागाकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सपाटीकरण किंवा अन्य स्वरूपाचे काम सुरू केले, तरी तलाठी व मंडळ अधिकारी तातडीने घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी करतात. पंचनामा करून नियमभंग आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. मग मुख्य रस्त्यालगत सुरू असलेल्या या अवाढव्य कामाचा पंचनामाही केला जात नाही.
सामान्य भूमिपुत्रांच्या छोट्या कामांवर कारवाई होते; मात्र धनदांडग्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये प्रशासनाची भूमिका वेगळी दिसून येत आहे. या उत्खननासाठी नेमकी किती ब्रासची परवानगी देण्यात आली नेमके किती अवैध उत्खनन झाले याचा उलगडा महसूलने करणे गरजेचे आहे. तात्पुरता पंचनामा करून विषय संपवण्याऐवजी प्रत्यक्ष उत्खननाची व्याप्ती निश्चित करून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.