खटाव : भांडेवाडी, ता. खटाव येथे कौटुंबिक वादातून झालेल्या खून प्रकरणातील तिघा संशयितांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अरबाज नंतास शिंदे, किर्लोस्कर निरगेल शिंदे, साजन किर्लोस्कर शिंदे (सर्व रा. कुरोली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
भांडेवाडी, ता. खटाव येथे दि. १६ मे रोजी कौटुंबिक वादातून किर्लोस्कर शिंदे, अक्षर अतुल शिंदे, साजन शिंदे आणि अरबाज शिंदे यांनी फिर्यादी झाकीर काळे, होश झाकीर काळे, अभिजीत काळे यांना मारहाण केली असल्याची फिर्याद पुसेगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या मारहाणीत होश काळे याचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील चारही संशयित घटनास्थळावरुन पसार झाले होते. पुसेगाव पोलिसांचे पथक संशयितांच्या शोधात असताना अरबाज शिंदे याला कुरोली परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते.
इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विश्वजीत घोडके, सपोनि नागनाथ खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अजरुद्दीन शेख आणि तपास पथकाने खटाव तालुक्यात ड्रोनद्वारे शोधमोहीम राबवली होती. एलसीबीचे अमोल माने यांनी किर्लोस्कर शिंदे याला कुरोली परिसरातून ताब्यात घेतले तर राहुल जाधव यांनी साजन शिंदे याला ताब्यात घेतले आहे. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली चार चाकी आणि लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयितांना न्यायालयाने ११ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजश्री तेरणी, पोलिस निरीक्षक विशवजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलिस उपनिरीक्षक अजरुद्दीन शेख, हवालदार योगेश बागल, विपुल भोसले, अमोल माने, पोलिस कॉन्सटेबल दऱ्याबा नरळे, अविनाश घाडगे, राहुल जाधव, उमेश देशमुख, शंकर सुतार, ज्ञानेश्वर जाधव, तुषार बाबर यांनी कारवाईत सहभाग घेतला.