सातारा : सातारा शहर परिसरातील वाहनांमधील बॅटऱ्या चोरणाऱ्याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयिताकडून 55 हजार रुपये किंमतीच्या 10 बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. दत्ता बबन ठोंबरे (वय 33, रा. पिलेश्वरीनगर, करंजे सातारा) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 6 नोव्हेंबर रोजी रमेश रघुनाथ शेडगे (वय 39, रा. करंजेपेठ, सातारा) यांनी शाहूपुुरी पोलिस ठाण्यात वाहनातील बॅटरी चोरी झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सातारा शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहनांमधील बॅटरी चोरी होण्याचे प्रमाण वाढल्याने शाहूपुरी पोलिस चोरट्याचा शोध घेत होते.
पोलिसांना संशयिताची गोपनीय माहिती मिळाली. शाहूपुरी पोलिसांनी संशयित दत्ता ठोंबरे याला ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संशयिताने गेल्या 3 महिन्याच्या कालावधीत वाढेफाटा, करंजे परिसरात उभ्या असलेल्या वाहनांमधून एकूण 10 बॅटऱ्या चोरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी एकूण 55,000 रुपये किंमतीच्या 10 बॅटऱ्या जप्त केल्या. पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय शिर्के, पोलिस सोनाली माने, निलेश काटकर, सुरेश घोडके, संदिप मदने यांनी कारवाईत सहभाग घेतला.