सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे सातारा येथे 50 खाटांच्या सर्व सुविधांनी युक्त जिल्हा एकात्मिक आयुष रुग्णालयास केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. या रुग्णालयामुळे जिल्ह्यातील रुग्णांना आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी पद्धतीचे उपचार स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत.
प्रस्तावित आयुष रुग्णालयात आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी वैद्यकीय अधिकारी यांचे तपासणी कक्ष, पंचकर्म सुविधा, क्षारसूत्र उपचार, अर्धांगवायूवरील आयुर्वेद उपचार, युनानी सेवा, योगसत्र, टेलीमेडिसिन सुविधा, सुवर्णप्राशन शिबिरे, गर्भसंस्कार व विविध आयुर्वेदिक उपचार उपलब्ध असणार आहेत.
रुग्णालयासाठी भव्य दोन मजली इमारत उभारण्यात येणार असून त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र जनरल वॉर्ड, चार स्पेशल रूम, मेन व मायनर ऑपरेशन थिएटर, योगा हॉल तसेच धन्वंतरी वनौषधी उद्यानाची सुविधा असणार आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, 12 स्टाफ नर्स, लेखापाल, मसाजिस्ट, औषध निर्माता, क्लर्क, चौकीदार, आया व स्वयंपाकी अशी एकूण 69 पदे निर्माण होणार आहेत. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक आयुष उपचार साताऱ्यातच उपलब्ध होणार असून वेळ व खर्चाची बचत होईल. जिल्ह्यातील आरोग्यसेवेला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला.