सातारा : अतित, ता. सातारा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) छापा टाकून देशी, विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. दुचाकीवरुन वाहतूक होत असताना ही कारवाई करुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकाश काशिनाथ सुतार (वय २४), सुरज संतोष यादव (वय २७ दोघे रा. अतीत ता. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, समर्थगाव अतित येथे विदेशी दारु विक्री होत असल्याची माहिती एक्साईज विभागाला मिळाली. त्यानुसार पथक तयार घटनास्थळी छापा टाकण्यात आला. यावेळी संशयिताकडे देशी, विदेशी दारुच्या ३६,१८० रुपये किंमतीच्या १८६ बाटल्या होत्या. एक्साईज विभागाच्या पथकाने त्या बाटल्या जप्त केल्या.
एक्साईजचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, विजय मरोड, बाळासो पाचुंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, जिल्ह्यामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.