सातारा : मर्यादित जागेत अधिकाधिक झाडांची लागवड करून कमी कालावधीत दाट हिरवाई निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मियावाकी तंत्राचा सातारा वन विभागाने यशस्वी प्रयोग केला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी १० हेक्टर क्षेत्रावर ‘अटल आनंदवन’ घनप्रकल्पांतर्गत ३ लाख झाडांची लागवड या तंत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या प्रयोगातून अवघ्या दहा महिन्यांत दाट हिरवाई उभी राहिल्याने वन विभागाचा आत्मविश्वास वाढला असून, आता या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहरीकरण, वाढती लोकसंख्या, रस्ते व पायाभूत सुविधांचा विस्तार यामुळे झपाट्याने कमी होत असलेल्या हिरवळीची भरपाई करण्यासाठी मियावाकी पद्धत प्रभावी ठरत आहे. पारंपरिक पद्धतीने मोठ्या क्षेत्रावर झाडे लावण्याऐवजी कमी जागेत स्थानिक प्रजातींची मोठ्या संख्येने लागवड केली जाते. झाडांची लागवड तुलनेने दाट असल्याने त्यांची वाढ जलद होते आणि काही वर्षांत त्या ठिकाणी नैसर्गिक जंगलासारखा परिसर तयार होण्यास मदत होते. साताऱ्यात करण्यात आलेल्या प्रयोगात या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष परिणाम दिसून आला आहे. लागवडीनंतर अवघ्या दहा महिन्यांत परिसरात दाट हिरवाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मियावाकी पद्धतीचा वापर करून कमी क्षेत्रात अधिक झाडे वाढवण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
मियावाकी पद्धतीत एकाच प्रकारची झाडे मोठ्या प्रमाणावर लावण्याऐवजी विविध प्रकारची झाडे एकत्र लावल्याने जैवविविधतेला चालना मिळते. जमिनीची सुपीकता वाढवणे, पाण्याची उपलब्धता टिकवणे आणि स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखणे, यासाठीही ही पद्धत उपयुक्त ठरते. दाट वृक्षलागवडीमुळे केवळ हिरवाई वाढणार नसून पक्षी, फुलपाखरे, कीटक आणि अन्य जीवांसाठीही अधिवास निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अशा छोट्या-छोट्या हरित क्षेत्रांचे पुढे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्व वाढू शकते.
साताऱ्यातील प्रयोगाच्या यशानंतर वन विभागाने २०२६-२७ या वर्षात आणखी १७.४० हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५ लाख २२ हजार झाडांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. कमी क्षेत्रात एवढ्या मोठ्या संख्येने वृक्षलागवड करण्याच्या या नियोजनामुळे जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढण्यास मोठी मदत होणार आहे. साताऱ्यातील पहिल्या प्रयोगातून दहा महिन्यांत मिळालेला सकारात्मक परिणाम लक्षात घेता वन विभागाने आता या पद्धतीचा विस्तार करण्यावर भर दिला आहे. १७.४० हेक्टर क्षेत्रावर ५ लाख २२ हजार झाडांची प्रस्तावित लागवड यशस्वी झाल्यास जिल्ह्याच्या हरित क्षेत्रात मोठी भर पडेल.
या लागवडीमध्ये स्थानिक वृक्षप्रजातींना प्राधान्य देण्याबरोबरच रोपांची योग्य निवड, मातीची पूर्वतयारी, पाणी व्यवस्थापन आणि लागवडीनंतरचे संगोपन यावरही भर दिला जाणार आहे. केवळ वृक्षलागवड न करता लावलेली रोपे जगविणे आणि त्यांचे जंगलात रूपांतर करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश राहणार आहे.- अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, सातारा