Crime Pudhari
सातारा

Satara crime news: दरोडेखोरांचा महिलेवर सशस्त्र हल्ला

पानस येथील थरारक घटना; कुडाळ परिसरात घबराट

पुढारी वृत्तसेवा

मेढा : जावली तालुक्यातील कुडाळ परिसरात सोमवारी मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न केला. यावेळी दरवाजा तोडायला विरोध करणाऱ्या महिलेवर त्यांनी चाकूने वार केला. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. धनश्री कदम असे त्यांचे नाव आहे. दरोड्याची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली आहे.

सोमवारी रात्री कुडाळजवळील पुनर्वसित पानस गावात दरोडेखोरांनी बंद घर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच हाती न लागल्याने त्यांनी कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम यांच्या शेतातील घरात चोरीचा प्रयत्न केला. तेथेही अपयश आल्याने त्यांनी तानाजी कदम यांच्या घराकडे मोर्चा वळवला. घरात तानाजी कदम, त्यांची पत्नी धनश्री आणि मुलगी होती. सुरुवातीला दरोडेखोरांनी दरवाजा ठोठावला. मात्र, कदम यांनी ‌‘कोण आहे?‌’ अशी विचारणा केली. त्यावर दरोडेखोरांनी लाथा मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू केला.

दरवाजा कोसळण्याच्या बेतात असतानाच तानाजी कदम यांच्या पत्नी धनश्री यांनी तो रोखला. याचवेळी तानाजी कदम यांनी स्वसंरक्षणासाठी हातात फावडे घेतले. हे पाहून दरोडेखोरांनी थेट धनश्री यांच्यावरच हल्ला चढवत हातावर चाकूने वार केले. याचवेळी तानाजी कदम यांच्या मुलीने शेजाऱ्यांना फोन करून मदतीसाठी बोलावल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. धनश्री यांच्या हाताला आठ ते दहा टाके पडले आहेत. त्यांच्यावर सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बंद घरे फोडणाऱ्या चोरट्यांकडून आता सशस्त्र हल्ले

कुडाळ परिसरात यापूर्वी झालेल्या घरफोडींचा छडा लागलेला नाही. चोरटे सशस्त्र हल्ले करू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. जावली तालुक्यातील पोलिस दलाची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेबाबत तातडीने सखोल चौकशी व ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT