सातारा

Satara Theft : आरळे परिसरात डीपी चोरट्यांचा धुमाकूळ

एफआयआर दाखल होऊनही कारवाईबाबत प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरळे, वडूथ, शिवथर व परिसरातील गावांमध्ये महावितरणच्या विद्युत रोहित्रांची (डीपी) चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. आरळे येथील शेतशिवारात गेल्या चार महिन्यात चार वेळा डीपी चोरीच्या घटना घडल्या असून, वडूथ व शिवथर परिसरातही अशा प्रकारच्या चोऱ्या झाल्या आहेत. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शेतकरी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी मोठा खर्च करून पिके उभी करतात. मात्र, वीजपुरवठा खंडित झाल्याने पिकांना पाणी देता आले नाही, तर त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ येते. शेतीचा वाढता खर्च, पिकांच्या उत्पादनाबाबतची अनिश्चितता आणि डीपी चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटना यांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

परिसरातील डीपी चोरीच्या घटनांप्रकरणी चार एफआयआर दाखल झाले आहे. मात्र, या गुन्ह्यांच्या तपासात किती प्रगती झाली, संशयितांची चौकशी झाली का, चोरीला गेलेले साहित्य हस्तगत करण्यात आले का आणि आरोपींना अटक झाली का हे गुलदस्‍त्‍यात आहे. डीपी चोरीमुळे वीजपुरवठा खंडित होणे, पिकांना वेळेवर पाणी न मिळणे आणि त्यातून नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. यासाठी तालुका पोलिसांनी तपास गतीने करून या घटनांचा छडा लावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT