मारूल हवेली : गांधीटेकडी इरिगेशन योजना बंद पडल्याने त्याचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. सिंचनाअभावी शेती उत्पादन घटले असून दुग्धव्यवसाय, पशुपालन, शेतीपूरक व्यवसाय आणि रोजगारावरही संकट ओढवले आहे. पाण्याअभावी पशुधनासमोर चारा व पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गांधीटेकडी परिसरातील शेतकरी प्रामुख्याने ऊस, भात, मका, सोयाबीन, भाजीपाला तसेच विविध नगदी पिकांवर अवलंबून आहेत. सिंचनासाठी या योजनेचे पाणी बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांना पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने शेकडो एकर क्षेत्रातील शेती पडीत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरच ही परिस्थिती उद्भवल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
अनेकांनी शेती मशागतीची तयारी पूर्ण केली असली तरी पाण्याअभावी पेरण्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई जाणवत आहे. विहिरी, कूपनलिका आणि स्थानिक जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
बांधकाम क्षेत्रालाही बसला फटका
विभागात झालेल्या पाणीटंचाईचा फटका बांधकाम क्षेत्रालाही बसला आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट आणि सिंचनासाठी पाण्याची कमतरता यामुळे बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून अनेक ठिकाणी बांधकामांची गती मंदावली आहे. घरबांधणी, व्यावसायिक इमारती, शासकीय विकासकामे तसेच रस्ते आणि काँक्रीटची कामे यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र सध्या विहिरी, बोअरवेल आणि स्थानिक जलस्रोत कोरडे पडल्याने बांधकाम व्यावसायिकांना टँकरद्वारे पाणी खरेदी करावे लागत आहे.