strike pudhari
सातारा

Satara News: जिल्ह्यात 2 हजार कृषी सेवा केंद्रांचा संप

शेतकरी हवालदिल : खरीप हंगाम पूर्वतयारी ठप्प

पुढारी वृत्तसेवा

सातारा : खत कंपन्यांकडून लिंकिंग बंद करावे, अप्रमाणित एचटीबीटी कपाशी बियाणे प्रतिबंधित करावे, साथी पोर्टलची सक्ती न करता ते बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपनीस्तरावर सुरू करावे, रासायिक खत वितरण विक्रेतयंच्या विक्री केंद्रापर्यत एफओआर (फॉर) पद्धतीने करावे या मागण्यांसाठी जिल्ह्यातील 2 हजार कृषी सेवा केंद्रांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शेतकरी अत्यावश्यक असलेली खते, कीटकनाशके आणि बियाण्यांच्या पुरवठा ठप्प झाला आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू असताना हा संप सुरू झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

रासायनिक खतांचे मार्जीन मिळावे, बियाणे, खते, कीटकनाशकांचे नमुने अप्रमाणित आल्यास विक्रेत्यांना आरोपी न करता कायद्यातील तरतुदीनुसार साक्षीदार म्हणून मान्य करावे. गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या सॅम्पलच्या प्रलंबित रक्कमा शासनाकडून विक्रेत्यास मिळाव्यात. तपासणी अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यासंबंधी कृषी विभागाने काढलेली अधिसूचना रद्द करावी. मुदतबाह्य किटकनाशके पुरवठादार कंपन्यांनी परत घेण्याची सक्ती करावी, या मागण्यांसाठी कृषी सेवा केंद्रांनी दि. 27 रोजीपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक कृषी इनपुट मिळत नसल्याने पेरणीपूर्व नियोजन कोलमडले आहे.

अनेक शेतकरी कर्ज काढून खते-बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत होते; मात्र उपलब्धता नसल्याने कर्जाची रक्कम अडकून पडली आहे. काही ठिकाणी पर्यायी साधनांचा शोध घेताना जादा दराने खरेदी करण्याची वेळ आली आहे. त्याचा ताण वाढला आहे. दरम्यान, कृषी विभागाने पुढाकार घेऊन मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, कृषी सेवा केंद्रांच्या संपामुळे बाजारातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून काळा बाजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. कृषी विभागासह प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करून संप मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

SCROLL FOR NEXT