सातारा विधानसभा निवडणूक  
सातारा

सातारा : निवडणूक लागण्यापूर्वीच प्रशासन सज्ज

पुढारी वृत्तसेवा

सातारा : विधानसभेचा बिगुल वाजला नसला तरी सातारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदारसंघाची मतमोजणी डिस्ट्रिक मार्केटिंग फेडरेशनच्या गोडावूनमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत सातारा आणि जावली तालुक्यांतील 464 मतदान केंद्रांवर सुमारे 3 लाख 41 हजार 833 मतदार हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी सुमारे 3 हजार 600 कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महिनाभरात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल, अशी शक्यता असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. भारत निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कामकाजाचा आढावा जिल्हाधिकार्‍यांकडून घेतला आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर विधानसभा निवडणुकीची सज्जता जवळपास पूर्ण झाली आहे.

जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. त्यातील सातारा विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले असते. सातारा विधानसभा मतदारसंघात सातारा आणि जावली या दोन तालुक्यांचा समावेश आहे. सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या सूचनेनुसार सातारा तहसीलदार नागेश गायकवाड आणि जावली तहसीलदार हणमंतराव कोळेकर यांच्याकडून निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे.

या मतदारसंघात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम पार पाडला आहे. मतदार यादीवर आलेल्या सुमारे 292 हरकतींवर प्रांताधिकार्‍यांसमोर 20 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मतदार यादी अंतिम झाल्यामुळे या मतदारसंघात 3 लाख 41 हजार 833 मतदार असून त्यामध्ये 1 लाख 71 हजार 286 पुरूष, 1 लाख 70 हजार 511 स्त्री तर 36 तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघात 464 मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी 520 बॅलेट युनिट (बीयू) व कंट्रोल युनिट (सीयू) लागणार आहेत. तर 529 व्हीव्हीपॅटची गरज भासणार आहे. ही ईव्हीएम मशीन्स उपलब्ध झाली असून त्यांची तपासणीही करण्यात आली आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडल्यांतर मतदान यंत्रे डिस्ट्रीक्ट मार्केटिंग फेडरेशनच्या गोडाऊनमध्ये (डीएमओ) ठेवण्यात येणार आहेत. याच ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

या निवडणुकीसाठी 3 हजार 600 अधिकारी तसेच कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. त्यानुसार कर्मचार्‍यांच्या माहितीचा ऑनलाईन डेटा संगणकावर भरण्यात येत आहे. त्यानुसार क्षेत्रीय अधिकारी तसेच नोडल अधिकार्‍यांच्या नेमणुकाही करण्यात आल्या आहेत. उर्वरित मतदान अधिकार्‍यांच्या नियुक्त्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात येणार आहेत. मतदान यंत्रांबद्दल मतदारांच्या मनात कोणतीही शंका, संभ्रम राहू नये तसेच नागरिकांना भयमुक्त व उत्स्फूर्तपणे मतदान करता यावे यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यानिमित्ताने मतदार जागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT