महाबळेश्वर : महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर पाच दिवसांपूर्वी एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला होता. त्याच्या नातेवाईकांनी या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देवूनही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. संबंधित अपघातातील पर्यटक कारसह पसार असूनही त्याचा शोध घेतला जात नाही. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांची उदासिनता संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नवनाथ चंद्रकांत पाकेरे (वय 30, रा. ओहळी पो. आसरे ता. वाई), असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
सोमवार दि. 12 मे रोजी वाई येथून महाबळेश्वरकडे दुचाकीवरुन (एमएच 11 सीएफ 0157) नवनाथ पाकेरे निघाले होते. त्यांची दुचाकी महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावरील बगीचा कॉर्नर नजीक आली असता समोरुन आलेल्या पर्यटकांच्या कारने (एम एच 01 सी पी 2970) दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये नवनाथ दुचाकीवरुन रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापद झाली.
दरम्यान, पर्यटक कारसह पसार झाले. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी नवनाथ पाकेरे याला महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथे नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. नवनाथ पाकेरे हे क्षेत्र महाबळेश्वर येथील एका हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी करत होते. वाई येथून नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी ते क्षेत्र महाबळेश्वर येथे निघाले होते. वेण्णालेक जवळील बगीचा कॉर्नर नजीक त्यांचा अपघात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असून त्यांच्या पश्चात चार वर्षांची मुलगी व एक वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
महाबळेश्वर- पांचगणी मुख्य रस्त्यावर घडलेल्या या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देखील नवनाथ यांच्या नातेवाईकांनी मिळवले असून या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नवनाथ यांना पांढर्या कारने धडक दिल्याचे दिसत आहे. गेल्या चार दिवसांपासून महाबळेश्वर पोलिस ठाण्यास नातेवाईकांनी या अपघाताची माहिती व सीसीटीव्ही फुटेज देऊनही अद्याप या अपघाताची नोंद झालेली नाही.