शिरवळ : शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्राऊंडसमोर कारने दुचाकीला धडक देऊन पादचारी महिलेला फरफटत नेले. या अपघातात महिला जागीच ठार तर कारचालकासह दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.
गंगामा बसवराज कितनूर (वय 32, मूळ रा. बंगळूर, राज्य- कर्नाटक सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा) असे अपघातात ठार झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याबाबत शिरवळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाजवळ असणार्या फुलोरा सोसायटीजवळ राहणारे गणेश दिलीप भोईटे (वय 31) हे इलेक्ट्रिक दुचाकी (एमएच-11 डीके 8383) ने पंढरपूर फाटा याठिकाणी निघाले होते.
त्यांची दुचाकी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पटांगणाजवळ आली असता लोणंद बाजूकडून शिरवळकडे भरधाव वेगाने आलेल्या कार (क्र. एमएच 12 टीएच 0337) ने दुचाकीला जोराची धडक देत मुलांना शाळेतून आणण्याकरता रस्त्याच्या बाजूने निघालेल्या पादचारी गंगामा कितनुर या महिलेला कारने फरफटत नेले. या विचित्र अपघातात दुचाकीचालक गणेश भोईटे, पादचारी गंगामा कितनुर ही महिला व कारचालक प्रदिप ग्रामोपाध्याय (रा.कोथरूड,पुणे) हे गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने शिरवळ पोलिसांनी धाव घेतली. यावेळी जखमींना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता गंगामा कितनुर या महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर कारचालक प्रदिप ग्रामोपाध्याय यांना अधिक उपचाराकरिता पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चेतन भोईटे यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस अंमलदार दत्तात्रय धायगुडे तपास करत आहेत.