वेणेगाव : सातारा तालुक्यातील रामकृष्णनगर येथे बुधवारी पहाटे अज्ञात वाहनाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. या अपघातात पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू झाला. संस्कृती विजय वाघमारे (21) असे मृत महिलेचे नाव आहे तर विजय वाघमारे असे जखमी पतीचे नाव आहे. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली .
रामकृष्णनगर येथील विजय वाघमारे आणि त्यांची पत्नी संस्कृती हे नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. ध्रुव पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावरून चालत असताना डंपरने त्यांना धडक दिली. यामध्ये संस्कृती यांचा जागीच मृत्यू झाला, तर विजय वाघमारे जखमी झाले आहेत. अवघ्या दीड वर्षापूर्वीच विवाह झालेल्या या दाम्पत्याच्या संसारावर काळाने घाला घातल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून, संशयित सहा वाहनांची तपासणी केली आहे. काही डंपरचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून दोषी चालकाचा शोध सुरू आहे.