लोणंद : लोणंद-फलटण मार्गावरील तरडगाव पुलाजवळ शुक्रवारी रात्री दुचाकी व कारच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जखमींना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पसार झालेल्या कार चालकाविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
राजेंद्र साहेबराव क्षीरसागर (वय ४०, रा. गोटेमाळ, लोणंद) आणि अभिषेक धनंजय कणसे (२४, रा. शेरेचीवाडी, ता. फलटण) अशी मृतांची नावे आहेत. तर अलंकार सूर्यकांत फडतरे (२४, रा. घाडगे कॉलनी, लोणंद) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तरडगाव हद्दीतील पुलाच्या पश्चिम बाजूस हा अपघात घडला. सचिन वसंत काशिद (रा. काशिदवाडी, ता. फलटण) हा त्याच्या ताब्यातील कार (एमएच १२ झेडसी ६५२७) भरधाव व निष्काळजीपणे फलटणच्या दिशेने चालवत असताना समोरील दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील क्षीरसागर आणि कणसे यांचा जागीच मृत्यू झाला; तर फडतरे गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर चालक काशिद याने जखमींना उपचारासाठी न नेता तसेच घटनेची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी सहायक कृषी अधिकारी संतोष साहेबराव क्षीरसागर यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चालक सचिन वसंत काशिद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
घटनेची माहिती मिळताच फलटण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच लोणंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनीही घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रोहित हेगडे करत आहेत.