उंब्रज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोर्टी (ता.कराड) गावच्या हद्दीत भरधाव जाणाऱ्या एका मालट्रकला कंटेनरने हुलकावणी दिल्याने मालट्रक चालकाचा ताबा सुटल्याने मालट्रक भराव पुलावरून खाली कोसळला. हा अपघात बुधवार दि. 8 एप्रिल रोजी पहाटे 5 च्या सुमारास घडला. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मालट्रकचे दोन तुकडे होऊन लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणेहून कराड दिशेकडे जाणारा मालट्रक क्रमांक एम.एच 43 वाय 6232 हा कोर्टी गावच्या हद्दीत बाजूने चाललेल्या एका कंटेनरने मालट्रकला हुलकावणी दिली असता मालट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटून मालट्रक भराव पुलावरून तीस फूट कोसळला. यामध्ये मालट्रकचे दोन तुकडे झाले.
अपघाताचा आवाज मोठा झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताची नोंद उंब्रज पोलिसात झाली आहे.