Accident File Photo
सातारा

Satara Accident : वडजलजवळ तीन कारची धडक; एकाचा मृत्यू, नऊ जखमी

वडजल-म्हसवड मार्गावर एच.पी. पेट्रोलपंपापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तीन कारची भीषण धडक

पुढारी वृत्तसेवा

म्हसवड : वडजल (ता. माण) गावच्या हद्दीत वडजल-म्हसवड मार्गावर एच.पी. पेट्रोलपंपापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर शनिवारी (दि. २६) सकाळी साडेअकराच्या सुमारास तीन कारची भीषण धडक झाली. या अपघातात संजय दिनकर पाटील (वय ४८, रा. वडगाव हवेली, ता. कराड; सध्या रा. पलूस, जि. सांगली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांमधील मिळून नऊ जण जखमी झाले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय पाटील हे एमएच १० एफए ०६२८ क्रमांकाची स्विफ्ट कार चालवत होते. भरधाव वेगाने वाहन चालवत त्यांनी गणेश रामचंद्र जाधव यांच्या एमएच १० बीएम ३७३५ क्रमांकाच्या इर्टिगा कारला ओव्हरटेक केले. त्यानंतर पुढे जात असताना समोरून येणाऱ्या एमएच ४२ एच ७१२१ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारला त्यांच्या कारने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर स्विफ्ट कार इर्टिगा कारच्या समोरील भागावर आदळल्याने तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

अपघातात स्विफ्ट कारमधील अर्चना संजय पाटील (३६), हर्षद संजय पाटील (१७), अशोक आकाराम सूर्यवंशी (५४), अरुणा अशोक सूर्यवंशी (४३) आणि अंकिता अशोक सूर्यवंशी (२१) हे जखमी झाले. स्विफ्ट डिझायरमधील गणेश केशव कांबळे (३५), आकाश मोहन कांबळे, विद्या मोहन कांबळे आणि मीनल मोहन कांबळे, (सर्व रा. म्हसवड/देवापूर परिसर), हेही जखमी झाले. जखमींवर म्हसवड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

या प्रकरणी गणेश रामचंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्यातील संशयित संजय पाटील यांचा अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपास पोलिस हवालदार डी. पी. खाडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT