सातारा

Satara Accident: अपघातानंतर मालतपूरमध्ये नागरिकांचा रस्ता रोको

नागरिकांनी युवकाच्‍या कुटुंबियाला आर्थिक मदत द्यावी व बेकादेशीर माती उपसा बंद करावा, अशी मागणी करण्‍यात आली.

पुढारी वृत्तसेवा

वाई : मालतपूर (ता. वाई) येथे डंपरच्या धडकेत युवकाचा मृत्‍यू झाल्‍यानंतर संतप्‍त नागरिकांनी रास्‍तारोको केला. यावेळी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्‍या माती वाहतूकीवर नागरिकांनी आक्षेप घेतला. याआंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्‍कळीत झाली होती. यावेळी नागरिकांनी युवकाच्‍या कुटुंबियाला आर्थिक मदत द्यावी व बेकादेशीर माती उपसा बंद करावा, अशी मागणी करण्‍यात आली.

शुक्रवारी सकाळी डंपरच्‍या धडकेत अभिजीत दत्तात्रय वाडकर या युवकाचा मृत्‍यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मालतपूर-वाई मार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलक ग्रामस्थांनी बेकायदेशीर माती उपसा आणि भरधाव धावणाऱ्या डंपर वाहतुकीमुळेच हा अपघात घडल्याचा आरोप केला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने परिसरात अपघातांची मालिका सुरूच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गेल्या दोन महिन्यांत पाच ते सात जणांचा विविध अपघातांमध्ये मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांनी केला.

डंपर चालक आणि बेकायदेशीर माती उपसा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घेतली. दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. रस्ता रोको आंदोलनामुळे मालतपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT