शिखर शिंगणापूर : दहिवडी-शिंगणापूर मार्गावर थदाळे गावानजीक दुर्गादेवीची ज्योत घेऊन जाणाऱ्या युवकांच्या पिकअपला ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार युवक गंभीर जखमी झाले.
सौरभ संतोष भंडलकर (वय २३), प्रवीण शिवाजी मोरे (वय २४), अरमान सलीम मुलाणी (वय १७), तुषार शिवाजी जाधव (वय १८) अशी जखमी युवकांची नावे असून सर्वजण इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गादेवीची ज्योत आणण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील नवरात्र मंडळाचे काही युवक पिकअप (क्रमांक एमएच ४२, बीएफ ८४२३) गाडीतून खटाव तालुक्यातील औंध याठिकाणी गेले होते. रविवारी सकाळी औंध येथील यमाईदेवीच्या मंदिरात ज्योत प्रज्वलित करून शेळगावकडे परत जात असताना वावरहिरे आणि थदाळे गावांच्या दरम्यान रजपूतवस्ती परिसरात हे युवक पाणी पिण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी शिंगणापूरच्या बाजूने येणाऱ्या ट्रेलरने (एनएल ०१, एन ३८४४) विरुद्ध बाजूला उभा असलेल्या कॅरी गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कॅरी गाडी पलटी झाली, तर ट्रेलरची मागील ट्रॉली रस्त्यावर तर त्याचे केबिन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पडले.
या अपघातात पिकअपमधील सौरभ भंडलकर, प्रवीण मोरे, अरमान मुलाणी, तुषार जाधव हे चार युवक गंभीर जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी जाऊन जखमींना मदत केली. अपघाताची माहिती मिळताच शिंगणापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नातेपुते येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. याबाबतचा अधिक तपास शिंगणापूर पोलिस दुरुक्षेत्राचे सहाय्यक फौजदार मोहन हंगे करत आहेत.