सातारा : मुंबईहून सातारा तालुक्यातून वडगाव येथे यात्रेसाठी माहेरी निघालेल्या विवाहितेवर काळाने घाला घातला. अवघ्या 2 वर्षाच्या बाळासह माता चालत्या रिक्षातून पडली. उपचारावेळी दुर्दैवाने मातेचा मृत्यू झाला असून बाळावर उपचार सुरू आहेत. भोंदवडे (ता. सातारा) येथे शुक्रवारी हा अपघात झाला. या घटनेमुळे समाजमनसुन्न झाले आहे.
स्वाती प्रतीक चव्हाण (वय 30, सध्या रा. डोंबिवली, मुंबई) असे अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. प्रणीत चव्हाण (वय 2) असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी सारिका रविराज आरगडे (वय 43, सध्या रा. नालासोपारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार या स्वाती चव्हाण यांच्या बहीण आहेत. याप्रकरणी सईद मज्जीद इनामदार (51, रा. समर्थगाव पो. अतित ता. सातारा) या रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.