दहिवडी : मलवडी, ता. माण येथे बस स्थानक परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एक युवक जागीच ठार झाला. तसेच एकजण गंभीर तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.
विशाल दादा जाधव (वय 23, रा. रामोशीवाडी - सत्रेवाडी, ता. माण) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, शिंदी खुर्द (ता. माण) येथील बाळासाहेब जाधव व अशोक काटकर हे दोघे दुचाकी वरून दहिवडीहून मलवडीकडे निघाले होते. तर विशाल जाधव हा मलवडीतून दहिवडीच्या दिशेने येत होता.
दुपारी सव्वा तीनच्या सुमारास या दोन्ही दुचाकींची मलवडी-दहिवडी रस्त्यावरील एका हॉटेल समोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की अपघानंतर दोन्ही दुचाकी काही फूट अंतरावर फरफटत जाऊन रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या. तसेच दुचाकीवरील तिघेही रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात विशाल हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला उपचारासाठी दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. तर मलवडीत किरकोळ उपचारानंतर अशोक याला घरी सोडण्यात आले. गंभीर जखमी बाळासाहेब जाधव यांना पुढील उपचारासाठी दहिवडीतील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.