परळी : परळी खोऱ्यातील उरमोडी प्रकल्पग्रस्त कामथी गावावर शुक्रवारी रात्री दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळला. ज्या घरात काही दिवसांत सनई-चौघडे दुमदुमणार होते, त्या घरातूनच अंत्ययात्रा निघाल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. मुलाच्या लग्नाची स्वप्नं डोळ्यांत साठवणारी आई, तिची बहीण, विवाहित मुलगी आणि सहा वर्षांची गोजिरी नात एका भीषण अपघातात काळाच्या पडद्याआड गेल्याने परळी खोऱ्यावर शोककळा पसरली अन् उरमोडीचा काठही गहिवरला. या दुर्घटनेने प्रकल्पग्रस्तांचं विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं.
कामथीच्या हृदयद्रावक अपघाताने साऱ्यांचेच काळीज पिळवटून गेले. मालन सिताराम अडागळे (वय 50), लिलाबाई उत्तम अडागळे (वय 56), कल्पना सागर आवळे (वय 36), गार्गी सागर आवळे (वय 6) यांना या अपघाताने हिरावून नेले. मालन व लिलाबाई यांच्यावर निमसोड (ता. खटाव) येथे तर कल्पना व गार्गी यांच्यावर कवठे (ता. वाई) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
उरमोडी धरणाच्या डाव्या बाजूला, पाण्याच्या काठावर वसलेलं छोटंसं कामथी गाव आता नावापुरतंच उरलं आहे. पुनर्वसनानंतर बहुतांश कुटुंबांनी नवीन गावठाण गाठलं; पण काही कुटुंबं अजूनही आपल्या जनावरांसह डोंगरमाथ्यावर राहत होती. त्यात सिताराम अडागळे यांचं कुटुंबही होतं. गुरं-शेळ्या राखत, शेती-मोलमजुरी करत त्यांनी संसार उभा केला होता. खटाव तालुक्यातील निमसोड येथे त्यांचं पुनर्वसन झालं होतं. तिथं त्यांनी नवीन घरही बांधलं होतं. मुलगा लक्ष्मणचं लग्न ठरल्यानंतर घरात आनंदाचं वातावरण होतं. नातेवाईकांना निमंत्रण देण्याची लगबग सुरू होती. नवीन गावात संसार थाटण्याची स्वप्नं प्रत्येकाच्या डोळ्यांत होती.
शुक्रवारी रात्री जुन्या गावातून शेवटचं साहित्य निमसोडला हलवण्याचं काम सुरू होतं. आयशर ट्रकमध्ये घरातील साहित्य, जनावरे आणि शेळ्या भरल्या जात होत्या. ट्रकच्या केबिनमध्ये मालन अडागळे, त्यांची बहीण लिलाबाई, विवाहित मुलगी कल्पना आवळे आणि सहा वर्षांची नात गार्गी बसल्या होत्या. रात्री सव्वानऊच्या सुमारास ट्रक उतारावर उभा असताना अचानक हॅन्ड ब्रेक निकामी झाला आणि क्षणार्धात ट्रक उताराने वेगाने दरीकडे घसरू लागला. अंधार, आजूबाजूला कोणी नसल्याने कुणालाच काही समजण्याच्या आत ट्रक सुमारे 60 ते 70 फूट खोल दरीत कोसळला.
मोठा आवाज होताच शेजारच्या कासारथळ गावातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. काळोखात मदतीसाठी होणारा आक्रोश आणि टाहो ऐकून प्रत्येकाचं काळीज पिळवटून निघालं. ग्रामस्थांनी तातडीने 108 रुग्णवाहिका आणि जेसीबीला पाचारण केलं. काही वेळात मदतकार्य सुरू झालं. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांनाही घटनेची माहिती मिळताच त्यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवत घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने ट्रक उचलण्यात आला. मात्र गाडीखालून बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांची अवस्था पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
या भीषण अपघातात मालन अडागळे, त्यांची बहीण लिलाबाई, विवाहित मुलगी कल्पना आवळे आणि चिमुकली गार्गी यांचा जागीच मृत्यू झाला. तर अर्चना आणि चार वर्षांचा अमेय जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘दादा, तुझं लग्न मोठ्या थाटात करायचं आपण गरीबीत दिवस काढले, पण आता नवीन गावात आनंदाने राहायचं,’ असं आपल्या मुलाला प्रेमाने सांगणारी आई मालन अडागळे स्वतःच मुलाच्या त्या आनंद सोहळ्याला आता कायमची मुकली. मुलगा लक्ष्मणच्या संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या या मायेनं अखेरच्या क्षणीही घरासाठीच धावपळ केली; मात्र नियतीने वेगळंच काही ठरवलं होतं. एका अपघातानं सारंचं काही हिरावून घेतलं.