कराड : दसर्याच्या शुभदिनी नव्या व्यवसायाची स्वप्ने पाहिली, कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले आणि आनंदाने गावाकडे परतीचा प्रवास सुरू केला. घरची वाट अवघी काही मिनिटांवर असताना नियतीने डाव साधला! पुणे - बंगळूर महामार्गावर कराडच्या युनिक उड्डाणपुलावर चारचाकीची ट्रकला धडक बसली आणि कातरखटाव (ता. खटाव) येथील चार तरुणांचा अंत झाला.
कराडजवळील नव्या उड्डाणपुलावरील अपघातात सुयश शशिकांत चिंचकर (वय २१), रोहित दादासो धोत्रे (२१), तेजस तानाजी देशमुख (२६, चारचाकी चालक) आणि सागर जालिंदर निंबाळकर (२६, सर्व रा. कातरखटाव, ता. खटाव) या चौघा तरुणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी अमन तांबोळी (२४), अर्णव दाभाडे (वय १५) आणि शंतनू शिंगाडे (२०) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे चार घरांतील आशा, स्वप्ने आणि आनंद एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने जिल्ह्यासह खटाव तालुका सुन्न झाला आहे. मृत व जखमी असे सातही युवक मंगळवारी चारचाकीने कोल्हापूरला व्यावसायिक कामासाठी गेले होते. एकाला दिवाळीत फटाक्यांचा स्टॉल सुरू करायचा होता. तर दुसर्याला चहा विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी फ्रँचायझी घ्यायची होती. व्यावसायिक कामे उरकून सर्वांनी अंबाबाईचे दर्शन घेतले होते आणि त्यानंतर त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला होता.
रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कराडजवळील शिवराज ढाब्यावर जेवणाचा बेत होता. मात्र, ढाबा अर्ध्या कि.मी.वर असतानाच सव्वापाच किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलावर चारचाकीने ट्रकला पाठीमागून धडक दिली. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत चालक तेजसवर गुन्हा नोंदविला आहे.
वेग, बंद दिवे अन् मनमानी पार्किंग...
अपघातावेळी उड्डाणपुलावरील विद्युत दिवे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून पुलावरील सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील लाईट बंद आहेत. याशिवाय अनेकदा उड्डाणपुलावर वाहन चालक मनमानीपणे थांबलेले पाहावयास मिळतात. तसेच सव्वापाच किलोमीटरच्या या उड्डाणपुलावरील वाहनांचा विशेषतः कार तसेच अवजड वाहनांच्या भरधाव वेगावर नियंत्रणच नसल्याचे अनेकदा पाहावयास मिळते.