सातारा

Satara Accident : दिवाळीपूर्वीच चार घरांतील दिवे मालवले

चार तरूणांच्या मृत्यूने कातरखटाव सून्न : स्वतःच्या पायावर उभे राहण्याची स्वप्ने अधुरी

पुढारी वृत्तसेवा
धनंजय क्षीरसागर

वडूज : दिवाळीचा सण तोंडावर आला होता. डोळ्यांत भविष्याची स्वप्ने, मनात स्वतःच्या हिमतीवर उभे राहण्याची जिद्द आणि कुटुंबासाठी काहीतरी करण्याची उमेद होती. कुणाला चहाचा गाडा सुरू करायचा होता, कुणी चायनिज आणि वडापावच्या व्यवसायातून स्वतःचे स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात होता, तर कुणाला वडिलांचा मेडिकल व्यवसाय विस्तारायचा होता. दिवाळीत फटाक्यांचा स्टॉल लावून चार पैसे अधिक कमावण्याचेही नियोजन होते.

मात्र, व्यवसायाची स्वप्ने घेऊन कोल्हापूरला गेलेल्या कातरखटावच्या सात मित्रांच्या परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. कराडजवळ पुणे-बंगळूर महामार्गावरील नव्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. क्षणात चार कुटुंबांचा आधार हरपला आणि अनेक स्वप्नांचा चक्काचूर झाला.

रोहित धोत्रे याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. कातरखटाव परिसरात चहाचा गाडा सुरू करून स्वतःच्या कष्टावर उभे राहण्याचा त्याचा मानस होता. छोट्या व्यवसायातून आयुष्याला नवी दिशा देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रोहितचा प्रवास मात्र अर्ध्यावरच थांबला. विकास सेवा सोसायटीचे सचिव पंढरीनाथ चिंचकर यांचा मुलगा सुयश चिंचकर याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता चायनिजचा गाडा सुरू करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि स्वतःचे भविष्य घडविण्याची त्याची धडपड अपघाताने संपुष्टात आली.

सागर निंबाळकर हा वडापाव विक्रीचा व्यवसाय करीत होता. कष्टाच्या जोरावर प्रगती साधण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होते. तर तेजस देशमुख याने डी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते. केशव मेडिकलचे मालक तानाजी देशमुख यांचा मुलगा असलेल्या तेजसला वडिलांचा व्यवसाय अधिक मोठा करण्याची इच्छा होती. शिक्षण आणि व्यवसायाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवण्याची त्याची स्वप्ने होती. मात्र, या चारही तरुणांच्या आकांक्षा एका अपघाताने कायमच्या अधुऱ्या राहिल्या.

दिवाळीच्या सणात फटाक्यांचा स्टॉल लावून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा विचार या मित्रांनी केला होता. त्यासाठी कोल्हापूरला जाऊन घाऊक दरात फटाके खरेदी करण्याचे नियोजन होते. विजयादशमीच्या मुहूर्तावर चहाचा गाडा खरेदी करण्यासाठी कोल्हापूरला गेलेल्या या मित्रांनी महालक्ष्मीचे दर्शनही घेतले. व्यवसायाची स्वप्ने, भविष्यातील नियोजन आणि मित्रांच्या सहवासातील आनंद घेऊन त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. मात्र, कराडजवळ पुणे-बंगळूर महामार्गावरील नव्या पुलावर त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला. ज्या हातांनी कष्ट करून भविष्य घडवायचे होते, ते हात कायमचे थंडावले. घरी परतल्यानंतर व्यवसायाची नवी सुरुवात करण्याच्या तयारीत असलेल्या या तरुणांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

या अपघातात रोहित दादासो धोत्रे याचा कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेजस देशमुख, सागर निंबाळकर आणि सुयश चिंचकर यांचा कराड येथील कॉटेज रुग्णालयात मृत्यू झाला. ऋतुराज दुबळे, शंतनू शिंगाडे आणि अमन तांबोळी हे तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच गावातील चार तरुणांचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने कातरखटाव गावावर शोककळा पसरली. सुयश चिंचकर आणि रोहित धोत्रे हे दोघेही आपल्या कुटुंबातील एकुलते एक मुलगे होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवरील दुःखाचा आघात अधिकच मोठा आहे. दिवाळीच्या आनंदाची तयारी सुरू असतानाच या घरांमध्ये दुःखाचा अंधार पसरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT