सातारा

Satara Accident: कार उलटून अभियंत्याचा मृत्यू

गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी जाताना भीषण अपघात; कवठे फाटा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

मसूर : गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघालेल्या तीन तरुण अभियंत्यांच्या कारला रविवारी (दि. १४) पहाटे पावणे एकच्या सुमारास भीषण अपघात झाला. पंढरपूर-मल्हारपेठ राज्य महामार्गावर वडोली भिकेश्वर हद्दीतील कवठे फाटा परिसरात ही घटना घडली. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार अनेक पलट्या खात शेतात जाऊन कोसळली.

या भीषण दुर्घटनेत कारचालक ओंकार अनिल खंडागळे (वय २३, रा. पाटण, मूळ रा. बीड) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार खंडागळे, हरिश सुरेश वाघमारे (रा. पडळ, ता. खटाव) आणि प्रतिक रमेश धावणे (रा. चंद्रपूर) हे तिघेही एका खासगी बांधकाम कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. रविवारची सुट्टी असल्याने ते शनिवारी रात्री कोरेगाव येथून गणपतीपुळे येथे दर्शनासाठी ओंकार यांच्या मालकीच्या कारमधून रवाना झाले होते.

रात्री सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास कवठे फाटा येथील वळणावर वाहनाचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला जाऊन प्रथम खड्ड्यात घुसली आणि त्यानंतर २-३ पलट्या खात सुमारे ३०० फूट अंतरावरील शेतात जाऊन कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या ओंकार खंडागळे यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. तर प्रतिक रमेश धावणे यांच्यावर कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू असून हरिश वाघमारे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

याप्रकरणी हरिश वाघमारे यांनी मसूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मसूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT