सातारा : गॅस एजन्सीच्या गोडावूनची तपासणी वारंवार न करण्यासाठी तसेच आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी कोरेगाव तहसीलमधील पुरवठा निरीक्षकाने एजंटाकडून 2 लाखांची मागणी करून सव्वा लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ कारवाई केली.
आनंद कैलास शिंदे (रा. कोरेगाव, मूळ रा. चोपडा जि. जळगाव), अवधूत दिलीप कालेकर (वय 36, रा. कोरेगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यातील शिंदे हा वर्ग 2 चा अधिकारी असून कालेकर एजंट आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे गॅस एजन्सी चालक आहेत. लाचेसाठी त्यांना वारंवार आनंद शिंदे याच्याकडून पैशांची मागणी होत होती. यामुळे तक्रारदार यांनी एसीबी विभागात दि. 1 एप्रिल रोजी तक्रार केली. एसीबी विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता सव्वा लाखाची लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. लाचेची रक्कम दि. 6 एप्रिल रोजी घ्यायचे ठरले. संबंधित लाचेची रक्कम शिंदे याच्या सांगण्यावरून कालेकर याने स्वीकारले. यावेळी एसीबीने कोरेगाव येथे रंगेहाथ पकडले.
दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात शासकीय कार्यालयाकडून लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबी विभागाने केेले आहे. पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुनील पाटील, पोलिस गणेश ताटे, नीलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे, सत्यम थोरात, नवनाथ शिंदे, महेश पुजारी यांनी कारवाईत सहभाग घेतला.