सातारा : सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाचा (सिव्हील) बिनधोक कारभार सुरु असल्याचे बुधवारी पुन्हा समोर आले असून 30 हजार रुपयांची लाच घेताना श्रीनिवास जोशी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा (ट्रॅप) कारवाई केली. एसीबी विभागाने संशयिताला ताब्यात घेतले आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, तक्रारदार यांचे वैद्यकीय बिल सिव्हील हॉस्पिटलमध्ये मंजुर करुन घेण्याचे काम होते. यासाठी तक्रारदार हे सहाय्यक अधीक्षक वर्ग 2 चे असलेले अधिकारी श्रीनिवास जोशी यांना भेटले. संबंधित मेडीकल बिल मंजूर करुन देण्यासाठी जोशीने लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी एसीबी विभागात तक्रार दिली. एसीबी विभागाने तक्रार दाखल करुन घेत पडताळणी केली असता 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी होत असल्याचे समोर आले.
लाचेची रक्कम बुधवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सांयकाळी ट्रॅप लावला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीने रंगेहाथ पकडून कारवाई केली. रात्री उशीरापर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात शासकीय कार्यालयात लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.