Scholarship exam : शिष्यवृत्ती परीक्षेकडे 697 विद्यार्थ्यांची पाठ  Pudhari
सातारा

Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षेकडे 697 विद्यार्थ्यांची पाठ

जिल्ह्यातील 241 केंद्रांवर परीक्षा : अधिकाऱ्यांनी भेटी देवून केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीची परीक्षा रविवारी जिल्ह्यातील 241 केंद्रांवर सुरळीत पार पडली. मात्र 697 विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. दरम्यान, अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातील परीक्षा केंद्राला महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी भेट दिली.

पाचवीच्या 142 केंद्रांवर 21 हजार 710 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी पेपर क्रमांक 1 साठी 21 हजार 521 विद्यार्थी उपस्थित होते तर 189 विद्यार्थ्यांनी मात्र दांडी मारली. पेपर क्रमांक 2 साठी 21 हजार 519 विद्यार्थी उपस्थित होते तर 191 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. आठवीच्या 99 केंद्रांवर 11 हजार 976 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी पेपर क्रमांक 1 साठी 11 हजार 818 विद्यार्थी उपस्थित होते तर 158 विद्यार्थ्यांनी मात्र दांडी मारली. पेपर क्रमांक 2 साठी 11 हजार 817 विद्यार्थी उपस्थित होते तर 159 विद्यार्थ्यांनी दांडी मारली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी साताऱ्यातील विविध केंद्रांना, माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी तारळे ता. पाटण व फलटण तालुक्यातील परीक्षा केंद्रांना तर महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी शिरवळ ता. खंडाळा व अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा येथे भेटी दिल्या. तर प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी कराड येथील यशवंत हायस्कूल, टिळक हायस्कूल, विठामाता विद्यालय, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय व कन्याशाळा येथील परीक्षा केंद्राला भेटी दिल्या.

तसेच शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे, हणमंत यादव, सन्मती देशमाने यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या. जिल्ह्यातील पाचवी व आठवीच्या 214 परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT