सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीतील मतदानाचा टक्का 9.28 ने घसरला आहे. सातारा हद्दवाढीनंतर 54 हजार 874 मतदार वाढले, तर 35 मतदान केंद्रांचीही भर पडली. असे असूनही नऊ वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील मतदानाच्या तुलनेत यावेळी मोठी घट झाली आहे. मतदानाकडे तब्बल 61 हजार 495 मतदारांनी पाठ फिरवली. त्याची टक्केवारी 41.46 इतकी असून हे मतदार गेले तरी कुठे? हा संशोधनाचा भाग झाला आहे.
सातारा पालिकेच्या सर्वात्रिक निवडणुकीवेळी अनेक ठिकाणी हाणामाऱ्या, तणातणी, बाचाबाचीचे प्रकार घडले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यासाठी उमेदवारांनी बऱ्याच क्लृप्त्या केल्या होत्या. मात्र झोपडपट्टी व हद्दवाढ भागातून नव्याने समाविष्ट झालेला मतदार मतदान प्रक्रियेकडे फिरकलाच नसल्याचे स्पष्ट होते. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाने स्वीप कार्यक्रम राबवून जनजागृती केली होती. सर्व 25 प्रभागांत फ्लेक्स, होर्डिंग्ज लावून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहनही केले होते. मात्र प्रत्यक्ष मतदानादिवशी मतदानासाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
साताऱ्यात एकूण मतदार 1 लाख 48 हजार 307 इतके आहेत. त्यामध्ये 73 हजार 848 पुरुष तर 74 हजार 426 स्त्री मतदार तर 33 तृतीयपंथीय मतदार आहेत. मात्र प्रत्यक्षात 86 हजार 812 मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 44 हजार 742 पुरुष (60.61 टक्के) तर 42 हजार 96 स्त्री (56.52 टक्के)मतदार आणि 14 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. त्याची टक्केवारी सुमारे 58.54 टक्के इतकी आहे.
या मतदान प्रक्रियेकडे तब्बल61 हजार 495 मतदारांनी अक्षरश: पाठ फिरवली. त्यामध्ये 29 हजार 106 पुरुष, 32 हजार 330 स्त्री तर 19 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. मतदान न करणाऱ्यांची टक्केवारी 41.46 इतकी आहे. साताऱ्याची हद्दवाढ होण्यापूर्वीची मतदारांची संख्या, त्यानंतर मतदारांची वाढलेली संख्या, मागील व यावेळी पालिका निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी लक्षात घेता यावेळी मतदारांचा सहभाग कमी असल्याचे स्पष्ट होते.