Ganesh Festival 
सातारा

Satara Ganesh Festival : जिल्‍ह्यातील ५८४ गावांमध्‍ये एकोप्‍याचा श्रीगणेशा

‘एक गाव, एक गणपती’ संकल्‍पनेला मंडळांचा प्रतिसाद; सलोख्‍याची परंपरा कायम

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, शांतता आणि बंधुभावाची नवी परंपरा रुजत आहे. जिल्ह्यातील ६ हजार २५६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी ५८४ गावांनी 'एक गाव, एक गणपती' ही संकल्पना स्वीकारली आहे. त्यातून गावागावांतील एकजूट अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे. उत्सवाला सामाजिक आणि विधायक उपक्रमांची जोड दिली जात आहे.

जिल्ह्यात तसेच तालुक्याच्या ठिकाणी नव्वदच्या दशकात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात या मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व, रांगोळी, पोस्टर यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करून समाजप्रबोधनाला प्राधान्य दिले जात होते. मात्र, कालांतराने मंडळांमध्ये वाढलेली चुरस, स्पर्धा आणि वाढता खर्च यामुळे काही ठिकाणी तणावाचे प्रसंग निर्माण होऊ लागले. त्याचा परिणाम पोलिस यंत्रणेवरील ताण वाढण्यातही झाला.

या पार्श्वभूमीवर अनेक गावांतील ग्रामस्थ आणि गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येत 'एक गाव, एक गणपती' संकल्पनेला बळ दिले. एकाच गणपतीची प्रतिष्ठापना करून संपूर्ण गावाने एकत्रितपणे उत्सव साजरा करण्याच्या या उपक्रमामुळे गावातील मतभेद कमी होण्यास, सामाजिक सलोखा वाढण्यास आणि बंधुभाव दृढ होण्यास मदत होत आहे.

या संकल्पनेमुळे मंडळांच्या खर्चातही बचत होत आहे. वर्गणीच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीचा वापर सामाजिक आणि विधायक कामांसाठी करण्याकडे मंडळांचा कल वाढला आहे. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छता अभियान यांसारखे उपक्रम उत्सवाचा भाग बनत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठीही काही मंडळांनी पुढाकार घेतला आहे.

बदलत्‍या सामाजिक जाणिवेचे चित्र

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकजुटीचा उत्सव ठरावा, या उद्देशाने 'एक गाव, एक गणपती' संकल्पनेला जिल्‍ह्यातील ५८४ गावांचा मिळणारा प्रतिसाद जिल्ह्यातील बदलत्या सामाजिक जाणिवेचे चित्र अधोरेखित करत आहे. मंडळांच्‍या विधायक उपक्रमांचा फायदा नागरिकांना होत असल्‍याने गणेशोत्‍सव सर्वसमावेशक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT