सातारा

Satara: 50 गुंठे वखार प्रकरण मॅनेज

कोट्यवधीच्या मालमत्तेकडे सातारा पालिकेचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सातारा : साताऱ्यातील बुधवार पेठेतील स. नं. 174 येथील बहुचर्चित 50 गुंठ्यावरील वखार प्रकरणाने नवे व धक्कादायक वळण घेतले आहे. पालिकेने या प्रकरणात कारवाईस सुरुवात करताच अचानक ब्रेक लागला. त्यामुळे हे वखार प्रकरण मॅनेज झाल्याची चर्चा सुरू आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी कारवाई होणार का याची उत्सुकता सातारकरांमध्ये निर्माण झाली आहे.

पालिकेची बुधवार पेठेत 50 गुंठे जागा असून ती भाडेपट्ट्याने दिली आहे. ही जागा सुमारे शंभर वर्षांसाठी भाडेपट्ट्याने दिल्याची चर्चा असून त्या संदर्भातील मूळ करारनामा अस्तित्वात आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबई प्रेसिडेन्सी कायदा 1901 अंतर्गत जिल्हा स्थानिक मंडळाच्या अखत्यारित शहर विकासाचे प्रश्न हाताळले जात होते. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 लागू झाल्यानंतर शहरातील लीजने दिलेल्या जागांचा आढावा घेणे कायद्याने आवश्यक ठरते.

मात्र या महत्त्वाच्या प्रश्नावर मौन बाळगले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पालिकेकडे संबंधित जागेच्या भाडेपट्ट्याचा अधिकृत करारनामा, नूतनीकरणाची कागदपत्रे, भाडे आकारणीच्या नोंदी व वापराची माहिती उपलब्ध आहे का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. शहरातील कोट्यवधींच्या मालमत्तेचा प्रश्न असताना या प्रकरणात सेटलमेंट झाल्याची चर्चा आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील सुमारे पन्नास गुंठे जागेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या घडामोडींनी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात मोठी उलाढाल होत असल्याचा संशय बळावला आहे. लाकूडसाठ्यावरही संशय असून तेथे कटावणीसाठी येणारी झाडे व लाकूड यासाठी परवाना आहे की नाही, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहता वन विभाग व महसूल विभागाने संयुक्त सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT