File Photo
सातारा

सातारा : भारतमातेच्या संरक्षणासाठी 262 जणांना वीरगती

जिल्ह्यातील सैनिकांची पराक्रमाची शर्थ : दुसरे जागतिक महायुद्ध, चीन, पाकिस्तानविरुद्ध युद्धात सहभाग

पुढारी वृत्तसेवा

सातारा : भारतमातेच्या संरक्षणासाठी वीरांचा जिल्हा असणार्‍या सातारा जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे. भूमीचे रक्षण करताना निधड्या छातीने लढून या वीरांनी प्राणांची आहुती दिली आहे. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास असणार्‍या या जिल्ह्याने आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांना चांगलेच ठेचले आहे.

दुसर्‍या जागतिक महायुद्धापासून इतिहासाचा धांडोळा घेतल्यास भारताविरोधात ज्या देशांनी युद्ध पुकारले, त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी सातारकरांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घातला आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील तब्बल 262 जवानांना भारतमातेचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झाली.

भारताला जरी 15 ऑगस्ट 1947 मध्ये ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले असले तरी शेजारी देशांच्या कुरापतींमुळे देशाच्या सीमाभागात कायमच अस्वस्थता राहिली आहे. सातारचे जवान 1948, 1965, 1971, 1999 मध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात मोठ्या त्वेषाने लढले आहेत. भारत पाकिस्तान युद्धातच तब्बल 143 सातारकरांना युद्धभूमीवर वीरमरण प्राप्त झाले आहे. जम्मू काश्मीरच्या रक्षणासाठी ज्या-ज्या कारवाया आपल्या सैन्यदलाने केल्या, त्यामध्ये सातारकर योद्ध्यांनी हिरहिरीने सहभाग घेऊन पराक्रमाची शर्थ केली आहे. जिल्ह्याला असलेल्या सैनिकी परंपरेत येथील जवानांनी सातत्याने भर घातली आहे. युद्ध कोणतेही असो या जिल्ह्यातील जवान निधड्या छातीने पराक्रम गाजवतात, हे वारंवार सिद्ध झाले आहे.

अपशिंगे गावचे मोठे योगदान

सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावाचे सैन्यदलासाठी मोठे योगदान आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबात सैनिकी परंपरा असून प्रत्येक घरातील 1 ते 2 व्यक्ती सैन्यदलात सेवा बजावत आहेत. युद्धात पराक्रम गाजवून निवृत्त झालेल्या जवानांचीही संख्या मोठी आहे. दुसरे जागतिक महायुद्ध, भारत- पाकिस्तान, भारत-चीन, बांगला देश मुक्ती युद्धासह जम्मू काश्मिरसह सीमावर्ती भागातील दहशतवादी कारवायांविरोधात अपशिंगेचे जवान जिद्दीने लढले आहेत.

वीरमरण आलेल्या सातारा जिल्ह्यातील सैनिकांची युद्धनिहाय संख्या

दुसरे महायुद्ध : 8

भारत-पाकिस्तान युद्ध 1948 : 2

भारत-चीन युद्ध 1962 : 19

भारत -पाकिस्तान 1965 : 60

नागरा हिल्स : 9

भारत-पाकिस्तान 1971 : 69

ऑर्चिड नागालँड : 2

ऑपरेशन मेघदूत जम्मू काश्मीर 1987 : 6

ऑपरेशन पवन 1987 : 9

ऑपरेशन मेघदूत जम्मू काश्मीर 1988 : 2

ऑपरेशन पवन 1988 : 2

ऑपरेशन रक्षक जम्मू काश्मीर : 47

ऑपरेशन पवन 1990 : 1

ऑपरेशन विजय कारगिल : 5

बर्फ वर्षावात शहीद : 5

इंडो म्यानमार बॉर्डर : 1

ऑपरेशन फॉल्कॉन सिक्किम : 2

गुजरात पूर : 1

ऑपरेशन आरएचएनओ : 3

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT