सातारा : सातारा जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतीचा धगधगता इतिहास घडवला. अनेकांच्या हौतात्म्यातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवून भारत मातेचे रक्षण करण्यासाठीही आजही जिल्ह्यातील हजारो जवानांनी छातीचा कोट केला.
आजही जिल्ह्यातील हजारो सैनिक सीमेवर रक्षणासाठी सज्ज आहेत, तर शेकडो सैनिक युद्धात कामी आले. ब्रिटिश सत्तेच्या काळात दुसऱ्या जागतिक महायुद्धातही सातारकरांनी पराक्रम गाजवला आहे. 1941 पासून आजअखेर 2026 पर्यंत 261 जवानांनी प्राणांची आहुती दिली आहे. ‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे... आणीन आरतीला हे चंद्र, सूर्य, तारे’ या कवणाप्रमाणेच सातारच्या निडर जवानांनी पराक्रम गाजवला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहिदांच्या आठवणींनी जिल्हा भावूक झाला आहे. त्यामुळेच तर ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी.. सैनिकहो तुमच्यासाठी...’ असे गौरवोद्गार बाहेर पडतात.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांशी लढताना जिल्ह्यातील अनेक क्रांतिकारक हुतात्मा झाले. या क्रांतिकारकांचा वारसाच आज देशातील जिगरबाज जवान चालवत आहेत. स्वातंत्र्याच्या लढाईत अग्रेसर राहिलेला सातारा जिल्हा स्वातंत्र्यानंतरही देशरक्षणात अग्रभागी राहिला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी आणि स्वातंत्र्यानंतर एक दोन नव्हे तर तब्बल 261 जणांनी देशरक्षणासाठी प्राणाची बाजी पणाला लावून हौतात्म्य पत्करले. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतीलच सर्वाधिक सैनिक सीमेवर लढतात. तर आतापर्यंत याच जिल्ह्यातील सर्वाधिक सैनिकांनी सीमेचे रक्षण केले.
शौर्यपदकांची अखंडित परंपरा
देशरक्षणार्थ 261 जवान शहीद झाले असले, तरी विविध युद्धांत शौर्य गाजवणारे जवानही जिल्ह्यात कमी नाहीत. 1941 पासून 2026 पर्यंत अनेक शहीदांनी मायभूमीच्या रक्षणासाठी रक्त सांडले आहे. वीरचक्र, महावीर चक्र, सेना मेडल, मेन्शन-इन- डिसपॅच, नौसेना मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल अशी शौर्यपदके पटकावण्याची परंपरा 1942 पासून आजतागायत सुरूच आहे.