सातारा : सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीमधील मतदार यादींच्या छाननीत 3 लाख 87 हजार 62 मतदार असून तब्बल 12 हजार 821 दुबार मतदारांची नोंद आढळली आहे. एकूण मतदार संख्येच्या तुलनेत हे प्रमाण 3.31 टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदार यादीत संबंधित दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून संबंधित मतदार एकाच प्रभागात मतदान करतील, अशी दक्षता मतदान अधिकारी घेणार आहेत.
सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड, मलकापूर या नगरपालिका तसेच मेढा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. या पालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित विधानसभा मतदारसंघाची मतदार याद्यी वापरुन ती प्रभागनिहाय फोडली. जिल्ह्यातील दहा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 3 लाख 87 हजार मतदारांची नोंद आहे. मतदार यादी कार्यक्रम सुरु असताना प्रशासनाला दुबार मतदार असल्याचे आढळून आले.
दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार करण्यात आला आहे. एकूण मतदार संख्येच्या तुलनेत हे प्रमाण 3.31 टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील शहरी मतदार यादीत एवढ्या मोठ्या प्रमाणात दुबार नोंदी आढळणे म्हणजे डेटा व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी आहेत. साताऱ्यासारख्या शिक्षणप्रेमी आणि प्रशासदृष्ट्या प्रगत जिल्ह्यात दुबार मतदारांची संख्या 12 हजाराहून अधिक असणे ही लक्षणीय बाब आहे. निवडणुकीपूर्वी संपूर्ण यादी तपासणे आवश्यक असल्याचे मत विरोधकांकडून व्यक्त केले जात आहे.
मतदार यादीत दुबार मतदार असले तरी संबंधित मतदारांसाठी मोहीम राबवण्यात येत आहे. दुबार मतदारांना विचारात घेऊन त्यांच्या पसंतीने एकाच प्रभागात मतदान करता येणार आहे. दुबार मतदार नोंदीची माहिती प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध केली जाणार आहे. संबंधित मतदार एकापेक्षा अधिक मतदान केंद्रावर मतदान करणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्यात आल्या होत्या. दुबार, मयत तसेच स्थलांतरित अशा सुमारे 1 लाख 50 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली होती.
जिल्हा प्रशासनाने मतदार यादीसंदर्भात चांगले काम केले होते. मात्र तरीही जिल्ह्याच्या शहरी भागात 12 हजार 824 दुबार मतदार सापडत असतील तर जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदार यादीत अशी आणखी नावे आढळू शकतात. त्यामुळे पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम जाहीर करून मतदार याद्यांतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.