Satara police action: सातार्‍यात 13 बीम लाईट चालकांवर गुन्हे  File Photo
सातारा

Satara police action: सातार्‍यात 13 बीम लाईट चालकांवर गुन्हे

34 ठिकाणी आवाजांचेही घेतले नमुने : मिरवणुकीतील दणदणाट येणार अंगलट

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातार्‍यात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून डीजेचा अक्षरश: दणदणाट झाला. दुसरीकडे डोळ्याला अपायकारक ठरतील अशा लायटिंगचाही झगमगाट होत शहरात रेकॉर्डब्रेक 25 तास गणपती विसर्जन मिरवणूक चालली. पोलिसांनी 34 डीजेंच्या आवाजाचे नमुने डेसीबलद्वारे घेतले असून 13 बीम लाईट चालकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवली. दरम्यान, डीजेवर खरंच कारवाई होणार की कारवाईचा फार्स ठरणार? हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

सातार्‍यात गतवर्षीप्रमाणेच गणेश आगमन सोहळ्याची चर्चा झाली. ज्येष्ठ नागरिकांनी डीजेला विरोध दर्शवत भरपावसात मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शवला. दुसरीकडे पोलिस प्रशासनानेही पोलिस ठाण्यानिहाय आगमन सोहळे फक्त शनिवारी निघतील अशा सूचना केल्या. पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे अतिउत्साही मंडळांनी डीजेचा दणदणाट करत गणेश आगमन मिरवणूका काढल्या. मात्र, पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेत सुरुवातीलाच डीजेसह बीम लाईट चालकांवर गुन्हे दाखल करत दाणादाण केली. यामुळे पोलिस फ्रंटफुटवर राहिले. शेवटच्या टप्प्यातील गणेश आगमन मिरवणूका डीजेच्या मर्यादित आवाजात झाल्या. गणेश चतुर्थी दिवशी देखील डीजेच्या मर्यादित आवाजात बाप्पांची स्थापना झाली.

तसेच अनंत चतुर्थीच्या अगोदर तीन दिवस देखील ज्या मंडळांनी गणपतीचे विसर्जन केले. त्यावेळी देखील डीजेचा मर्यादित आवाज ठेवला. या सर्व प्रकारामुळे अनंत चतुदर्शीला डीजे दोरीत राहील, असे वातावरण निर्माण झाले. मात्र, गणेश मंडळ, डीजे चालकांनी हे सर्व अंदाज फोल ठरवले. शनिवारी दुपारी सातार्‍यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणेश भक्तांनी बाप्पांच्या भेटीसाठी गर्दी केली. यामुळे सातारा बाप्पामय व गणेश भक्तमय झाला होता.

दुपारी ढोल, ताशा, लेझीम अशी पारंपारिक वाद्ये होती. मात्र सायंकाळनंतर पारंपारिक वाद्यांची जागा डीजे व बीम लाईटने घेण्यास सुरुवात केली. सायंकाळ ते रात्री 12 पर्यंत डीजे व बीम लाईटचाच सातार्‍यावर माहोल राहिला. गणेश मंडळे एकमेकांसमोर येताना व जाताना इर्षेने डीजे जोरजोरात वाजवत होती. डीजे दणाणू लागल्यानंतर ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिला मिरवणूकीतून निघून जावू लागले. गणेश विसर्जनाचा नूर लक्षात घेवून पोलिसांनी डेसीबल मीटरच्या सहाय्याने डीजेंच्या आवाजांची मर्यादा तपासण्यास सुरुवात केली. पोलिस हरतर्‍हेने डीजे चालक, गणेश मंडळांना आवाज कमी करण्याच्या सूचना करत होते.

मात्र, पोलिसांच्या या सूचनेला केराची टोपली दाखवली गेली. पोलिस आहेत तोपर्यंत आवाज कमी व्हायचा. मात्र पोलिस पुढे गेले की आवाज वाढायचा. अशाप्रकारे सातार्यात पोलिस, डीजेचा लंपडांव पहायला मिळाला.

...यांच्यावर झालेत गुन्हे दाखल

दि. 5 व 6 सप्टेंबर रोजी निघालेल्या मिरवणुकीमध्ये अनेक ठिकाणी डोळ्याला त्रास होईल, अशा बीम लाईटचा व डीजे वाहनांचा वापर करण्यात आला. त्यानुसार सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी पोलिसांनी बीम लाईट चालकावर गुन्हे दाखल केले आहेत. साई लाईट्स कोरेगाव, मयुर आबा ढेंबरे (वय 29, रा. वडजल, ता. फलटण) व अजित प्रमोद रासकर (19, रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे), वरद अनिल देशमुख (रा. मंगळवार पेठ, सातारा), अमित अर्जुन कदम (रा. आरळे, ता. सातारा), अजिंक्य लाईट कोडोली, सूरज मुसा आत्तार (रा. नंदगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर), राहुल बाळकृष्ण बनसोडे (रा. रविवार पेठ, सातारा), यश रवींद्र भोसले (रा. एकसळ, ता. कोरेगाव) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT