Abortion Pudhari
सातारा

Satara News: जिल्ह्यात एका वर्षात 120 गर्भपात

वाढत्या वयातील लग्न, करिअरची ओढ व ताण तणावांमुळे प्रमाण वाढले

पुढारी वृत्तसेवा
मीना शिंदे

सातारा : आधुनिक जीवनशैलीत वाढत्या वयातील लग्नामुळे निर्माण होणारी गुंतागुंत, व्यस्त दिनचर्या, करिअरची ओढ, स्पर्धा, ताण तणावांमुळे गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार डिसेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या एका वर्षात 120 गर्भपातामुळे जीव जन्मापासून मुकले आहेत.

करिअरला प्राधान्य देणारी पिढी स्थिरस्थावर झाल्यावर विवाहाचा विचार करत आहे. त्यामुळे लग्नाचे वय वाढत आहे. त्यामुळे गर्भधारणेत गुंतागुंत तसेच लोहाच्या कमतरतेमुळे गर्भपाताची शक्यता वाढत आहे. गंभीर आजार व इतर कारणांमुळेही गर्भपाताचा निर्णय घेतला जात आहे. आईच्या जीवाला धोका टाळण्यासाठी, भविष्यातील निरोगी मातृत्व जपण्यासाठी वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने सुरक्षित गर्भपात हा वैद्यकीय आधार असतो.

परंतू बदलत्या सामाजिक परिस्थितीत आजच्या महिलांमध्ये करिअरला अधिक प्राधान्य दिले जात आहे. काही महिलांना नोकरी टिकवण्यासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भपाताचा मार्ग निवडावा लागतो. तसेच दोन मुलांच्या जन्मामध्ये योग्य अंतर ठेवण्यासाठी गर्भपाताचा मार्ग निवडावा लागतो. ती काळाची गरज असली तरी त्याचा फटका कुटुंब व्यवस्थेला बसत आहे. मुलींचा जन्मदर कमी असल्यानेच आज मुलांच्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याने सामाजिक समस्या निर्माण झाली आहे.

प्रशासनाकडून पी सी पी एन डी टी कायद्याच्या अंमलबजावणी द्वारे गर्भलिंग निदान करुन होणाऱ्या गर्भपातावर निर्बंध आणले जात असले तरी वैद्यकीय अडचण व नैसर्गिक रित्या होणाऱ्या गर्भपाताचे प्रमाण वाढणे चिंताजनक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT