सातारा : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान प्रदर्शनात सातारा जिल्ह्यातील 11 वैज्ञानिकांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली. निवड झालेल्या वैज्ञानिकासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेतून वैज्ञानिकांच्या संशोधनाला आणखी बळ मिळणार आहे.
उच्च प्राथमिक गटात जकातवाडीच्या शारदाबाई पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील अभिनव सातपुते यांच्या इलेक्ट्रिक आर्यन सेफ्टी मल्टीपर्पज कीट या उपकरणाला प्रथम क्रमांक, नायगावच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या शिवानी गिरमे हिच्या दिव्यांगासाठी औषध फवारणी यंत्र या उपकरणाला द्वितीय क्रमांक तर कराडच्या रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या अनिश निकम यांच्या होसेन्स इमर्जिंग टेक्नॉलॉजी या उपकरणाला तृतीय क्रमांक मिळाला.
दिव्यांग विद्यार्थी उच्च प्राथमिक गटात संभाजीनगरच्या भारत विद्या मंदिरमधील विघ्नेश दरेकरच्या विघ्नेश प्रभक्रांती वर्धक या उपकरणास प्रथम तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात वाईच्या ज्ञानदीप स्कूलच्या रोशन वाशिवले याच्या स्मार्ट मल्टीपर्पज स्टिक फोर एल्डरली पिपल या उपकरणास प्रथम, सातारच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या हर्षवर्धन साळुंखे याच्या ओनियन स्प्रिंग कटर या उपकरणास द्वितीय तर कराडच्या रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या सौख्य पाटील यांच्या शेतकरी एएपी या उपकरणात तृतीय क्रमांक मिळाला. दिव्यांग विद्यार्थी माध्यमिक, उच्च माध्यमिक गटात अंबवडेच्या भूतेश्वर विद्यामंदिरच्या युवराज पवारच्या ऍडजेस्टेबल स्पॅनर या उपकरणास प्रथम, शिक्षक शैक्षणिक साहित्य उच्च प्राथमिक गटात रुवले जिल्हा परिषद शाळेच्या दत्तात्रय धोंडिराम पोळ यांच्या बहुउद्देशीय मनोरंजक गणित पेटी या उपकरणास प्रथम.
शिक्षक शैक्षणिक साहित्य, माध्यमिक, उच्च माध्यमिक गटात फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या धनंजय दिनकर सस्ते यांच्या बर्नोलीज प्रिन्सिपल या उपकरणास प्रथम तर प्रयोगशाळा सहायक, परिचर शैक्षणिक साहित्य माध्यमिक, उच्च माध्यमिक गटात साखरवाडी विद्यालयाच्या जयंत हनुमंत काळुखे यांच्या बहुउद्देशीय सायकल या उपकरणास प्रथम क्रमांक मिळाला. या सर्व उपकरणाची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली.