Accident  
सातारा

Satara Accident: ॲडमिशन घेऊन परतणार्‍या दोघांवर काळाचा घाला

सारोळा पुलावर अपघात : तीन दिवसांपूर्वीच घेतली होती दुचाकी

पुढारी वृत्तसेवा

शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावर भोर तालुक्यातील सारोळा येथे झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या नव्या दुचाकीवरून नसरापूर कॉलेजचे ॲडमिशन करून परत येत असताना हा अपघात झाला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर राजगड पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

तुषार दादासाहेब शिंदे (वय १७, रा. नायगाव, ता. खंडाळा) आणि त्याचा मित्र अथर्व विजय पाटील (वय १७, रा. शिरवळ, ता. खंडाळा) अशी अपघातात ठार झालेल्‍या मुलांची नावे आहेत. रविवारी (दि. १) सायंकाळी सारोळा गावच्या हद्दीतील पुणे-सातारा महामार्गावरील हॉटेल नवलाईसमोर हा अपघात घडला. तुषार व अथर्व हे हे दुचाकीवरून नसरापूरहून शिरवळच्या दिशेने जात होते.

यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तुषार शिंदे याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अथर्व पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी राजेंद्र गोविंद नेवसे यांच्‍या फिर्यादीवरून राजगड पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू केली आहे.

कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन परतत असताना घडलेल्या या अपघातामुळे नायगाव, शिरवळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. अपघताने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पसार वाहनचालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून त्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT