File Photo
सातारा

Schoolgirl Murder: सासपडेत सडा रांगोळी नाही की गोडधोड नाही

गावकऱ्यांनी दिवाळी केलीच नाही : खदखदणारा आक्रोश गावाने दिला दाखवून

पुढारी वृत्तसेवा

शरद पवार

नागठाणे : सासपडे (ता. सातारा) येथील शाळकरी मुलीच्या निर्घृण खुनाच्या घटनेतून अख्खं गाव अद्यापही सावरलेलं नाही. या घटनेने समाजमन संतप्त असून दिवाळीसारखा मोठा सण साजरा न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी संघटितपणे घेतला. त्यानुसार सोमवारी दिवाळीच्या पहिल्या दिवशी गावात कुणीही दारात सडा रांगोळी काढली नाही की कोणी घरात गोडधोड पदार्थ बनवले नाहीत. नवीन खरेदी नाही की फटाक्यांचा कसलाही आवाज नाही. आसमंतात पणत्यांचं तेजही नसल्याने या गावाने प्रत्येकाच्या मनात खदखदणारा आक्रोश यानिमित्ताने दाखवून दिला.

सासपडे हे सुमारे 6 हजार लोकसंख्येचे गाव. स्वातंत्र्यसैनिकांचे गाव अशीही या गावाला ओळख आहे. गावाने राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. गावातील अनेक तरुण सैन्यात तसेच प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. या शातंताप्रिय गावात दहा दिवसांपूर्वी मात्र मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. तेरा वर्षाच्या शाळकरी मुलीचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी राहूल यादव या नराधमाला पोलिसांनी अटकही केली. या घटनेने सासपडेसह अख्खा परिसर हादरुन गेला. या संतापजनक धक्क्यातून अद्यापही येथील जनजीवन सावरलेलं नाही. गेल्या दहा दिवसांपासून गावाने रस्ता रोको, कँडल मार्च, मोर्चा, जनआक्रोश सभा इत्यादींच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात खदखदणारा संताप व्यक्त केला.

या घटनेमुळे सासपडेकरांच्या मनात जणूकाही आपली लाडकी लेकच गमावल्याची भावना आहे. त्यातूनच दिवाळीसारखा मोठा सण साजरा न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. यासाठी सोशल मीडियावरून संदेश तसेच जनजागृती झाली. सासपडे ग्रामस्थांनी याला सकारात्मक पाठिंबा दिला. त्यामुळे सोमवारी दिवाळीचा पहिला दिवस असूनदेखील गावात कुठेही दिवाळीचा थाटमाट झाला नाही. कुणीही घरात गोडधोड पदार्थ बनवले नाहीत. दारात सडा रांगोळी नाही, नवीन कपडे खरेदी केली नाही, फटाकेही उडवले नाहीत. पणत्या लावल्या नाहीत, कुणाच्या घरावर आकाश कंदीलही झळकले नाहीत. अशा या भावूक वातावरणात सासपडेने दिवाळीचा पहिला दिवस अनुभवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT