सातारा : उरमोडी धरणाच्या पाण्याने अनेकांची घरे, शिवार आणि बालपणाच्या आठवणी गिळंकृत केल्या; परंतु काहींच्या मनात त्याच पाण्याने जिद्दीचे तरंग उठवले. भिवडी (ता. कोरेगाव) येथील संतोष गजानन शेलार यांची कहाणी ही अशाच जिद्दीच्या लाटांवर उभी राहिलेली यशोगाथा आहे. विस्थापिताच्या वेदना, आर्थिक चणचण आणि अनिश्चिततेच्या सावटातही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. संतोष शेलार हे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सचिवपदी विराजमान झाले. त्यांनी या यशातून संपूर्ण जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
उरमोडी धरणामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेलार कुटुंबाला नव्याने संसार उभारण्याचे आव्हान पेलावे लागले. घरदार, शेती आणि जीवनाचे स्थैर्य हरवले असतानाही शिक्षण हाच जीवन मार्ग या विश्वासाने संतोष शेलार यांनी पुढे पाऊल टाकले. अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी शैक्षणिक प्रवास सुरु ठेवला. डिप्लोमा परीक्षेत त्यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. अभियांत्रिकी पदवी (बीई) व पदव्युत्तर (एमई) परीक्षेत पुणे विद्यापीठात अव्वल स्थान मिळवून त्यांनी यश आणि गुवत्तेची साक्ष दिली; पण हा यशाचा मार्ग संघर्षाच्या काट्याकुट्यांनी, खाचखळग्यांनी भरलेला होता. जीवनाच्या एका टप्प्यावर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. मात्र केबीपी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. के. एस. शेख, प्रा. व्ही. एस. चिरमुले आणि प्रा. एस. एम. गोपाल या प्राध्यापकांनी मदत केली. कुटुंबाचा आधारही त्यांना मिळाला. अडचणी या पराभवासाठी नसतात, त्या पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात, हा विचार त्यांच्या मनाला स्पर्शून गेला. शिक्षण हे आयुष्य बदलण्याचे साधन मानून त्यांनी स्वत:ची जडणघडण केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2002 साली घेण्यात आलेल्या इंजिनियरिंग सर्व्हिसेस परीक्षेत संतोष शेलार यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवत थेट कार्यकारी अभियंता पद मिळवले. 2015 मध्ये त्यांची अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती झाली. नांदेड व सोलापूर येथे त्यांनी चमकदार कामगिरी केली. त्यानंतर त्यांची राष्ट्रीय महामार्ग विभागात मुख्य अभियंता म्हणून चोख जबाबदारी पार पडली. या कार्यकाळात त्यांनी प्रामाणिकपणा, शिस्त आणि कर्तव्यदक्षता या त्रयींचा संगम साधत प्रत्येक जबाबदारी उत्तमरित्या निभावली. अधिकारी म्हणून त्यांनी केवळ प्रशासकीय कामकाज न पाहता, लोकाभिमुख दृष्टिकोन जपला. कामातील सातत्य आणि निर्णयक्षमतेमुळे त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मुख्य अभियंता म्हणून राष्ट्रीय महामार्गाची जबाबदारी सांभाळता त्यांनी विविध महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्यपद्धतीत काटेकोर नियोजन, वेळेचे भान आणि गुणवत्तेत तडजोड न करणारी वृत्ती दिसून आली. परिणामी, शासनाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास अधिक दृढ होत गेला. अखेरीस त्यांच्या गुणवत्तेची दखल घेत त्यांनी राज्याच्या बांधकाम विभागात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांची ही पदोन्नती असली तरी त्यांनी जिद्दीने लिहिलेल्या यशोगाथेचा परमोच्च बिंदू ठरला.