सातारा : सातार्यातील उत्कृष्ट कामाचे बक्षीस म्हणून सातार्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातार्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑर्डर झाल्यानंतर गुरुवारीच संतोष पाटील यांनी पद्भार स्वीकारला.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन (सेवा) विभागाने भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांच्या गुरुवारी बदल्यांचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सातारा जिल्ह्यात विकासाची उत्कृष्ट परंपरा निर्माण केली. कार्यालयीन कामकाजाच्या चाकोरीतून बाहेर जाऊन त्यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या द़ृष्टीने चांगले प्रकल्प राबवले. या प्रकल्पाची कामे सुरू असतानाच त्यांची पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली.
7 जून 2023 रोजी जितेंद्र डुडी यांनी सातारा जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली. अवघ्या 17 महिन्यांच्या कालावधीत जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्याच्या विकासाचा रोड मॅप तयार केला. ‘डुडी है तो मुमकीन है’ याच स्टाईलने त्यांनी काम करत जिल्ह्याचे नाव देशपातळीवर नेले. भ्रष्टाचारास आळा घालत पारदर्शकतेसाठी त्यांनी प्रशासनात अनेक बदल केले. त्यांच्या या कामकाजाचे सर्वत्र कौतुक झाले. गेल्यावर्षी पुण्यात वित्त विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जितेंद्र डुडी यांचे कौतुक केले. त्यांना पुणे जिल्हाधिकारीपदाची खुली ऑफर दिली. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री राजी नसल्याने आणि डुडी यांनी नम्रपणे नकार दिल्यामुळे त्यावेळची त्यांची बदली थांबली. आता नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आयएएस अधिकार्यांच्या झालेल्या बदल्यांमुळे जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारीपद देण्यात आले. तर त्यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संतोष पाटील हे मूळचे उंडेगाव (ता. बार्शी) येथील आहेत. कार्यक्षम व मितभाषी अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे ते पदवीधर आहेत. 1995 मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून 1996 रोजी यवतमाळ जिल्ह्यातून सेवेस सुरूवात केली. प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, विशेष भूमी संपादन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, रोहयो उपजिल्हाधिकारी, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. 2026 साली अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी 2018 पर्यंत नांदेड येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर 2018 ते 2020 या दरम्यान पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी कामकाजाचा ठसा उमटवला. 2020 मध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्तपदी काम केले. सध्या ते पुणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष पाटील यांना प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वीच्या जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्याच्या विकासाची राखलेली परंपरा संतोष पाटील हे कायम ठेवतील. पर्यटन प्रकल्प, माझी शाळा, आदर्श शाळा तसेच स्मार्ट पीएचसी असे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना संतोष पाटील हे गती देतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक वारसा आहे. जिल्ह्यात काम करण्यासाठी खूप संधी आहे. जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमांना लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे काम करण्याचा आणखी उत्साह वाढला. लोकप्रतिनिधी तसेच सहकार्र्यांचे सहकार्य लाभले. सातारकरांशी जोडलेले हे ऋणानुबंध कायम लक्षात राहतील.- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे
प्रधानमंत्र्यांच्या विकासाच्या संकल्पना तळागाळात नेण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे. लखपती दीदी योजनेतून गरीब महिलांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाईल. जलजीवन मिशन योजना पूर्ण करणार आहे. कामकाजात गती व पारदर्शकता येण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर करणार असून, कार्यालयीन कामकाज पेपरलेस करणार.- संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा