फलटण : ज्या रामराजेंनी कृष्णा खोरे महामंडळ स्थापनेत पुढाकार घेतला. कृष्णा खोर्यातील पाण्याचा सखोल अभ्यास केला, लवादाचा अभ्यास करून महाराष्ट्राच्या वाट्याचे 96 टीएमसी पाणी शासनाच्या मदतीने अडवण्यासाठी परिश्रम घेतले. कृष्णा खोरे प्राणी प्रश्नासाठी 30-32 वर्षे काम करतायेत, हे वास्तव महाराष्ट्रासह पाणी प्रश्नाचे ज्ञान असणारे जाणकारही मान्य करतात. मात्र, आ. रामराजेंचा पाणी प्रश्नी अभ्यास नाही, असे भाष्य करणार्या व रेटून खोटं बोलणार्या माजी खासदारांची व त्यांच्या पाणी प्रश्नी असलेल्या अभ्यासाची कीव करावीशी वाटते. काहीही बोलून माजी खासदारांनी अकलेचे तारे तोडू नयेत, असा घणाघात जि.प.चे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.
पाणी प्रश्नावर आ. रामराजेंचा अभ्यास नाही, त्यांना तांत्रिक ज्ञान नाही म्हणून ते शेतकर्यांची दिशाभूल करतायेत, अशा प्रकारचा आरोप प्रसार माध्यमांशी बोलताना माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी केला होता. त्याबाबत पाणी प्रश्नाचे वास्तव प्रसारमाध्यमांना सांगताना संजीवराजे बोलत होते. यावेळी अनिकेतराजेही उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, प्रथेप्रमाणे निरा उजव्या कालव्यातील लाभक्षेत्राला पाण्याची आवर्तने दिली जातात. यावेळी पाणी वाटप समितीकडे प्रथमच उन्हाळी हंगामात तिसंगी व अन्य भागाला पाणी मिळावे, अशी मागणी झाली आहे. नव्याने पाण्यात वाटा मागितल्याने मूळच्या लोकांचे पाणी कमी होणार म्हणून आ. रामराजेंनी प्रथेप्रमाणे पाणी वाटप करावे त्यात बदल करू नये, ही लाभधारक शेतकर्यांच्या हिताची भूमिका घेतली. यावर अभ्यास नसणार्या माजी खासदारांनी आ. रामराजेंचा पाणीप्रश्नी अभ्यास नाही, असे भाष्य केले. खरंतर रामराजेंची कृष्णा खोरे महामंडळाच्या स्थापनेपासूनची भूमिका. धरणं निर्माण करण्याची आवश्यकता. लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे कृष्णा खोरे महामंडळातील पाणी अडवण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट हे सर्वश्रुत आहे. खरंतर पाणी प्रश्नी माजी खासदारांना काहीच ज्ञान नाही. तरीही तेच रामराजेंचा पाणी प्रश्नी अभ्यास नाही असे बोलतातच कसे? हे चुकीचं आहे. रामराजेंचा पाणी प्रश्नी गाढा अभ्यास आहेच. काहीही ज्ञान नसलं तरी रेटत बसायचं ही माजी खासदारांची पद्धतच आहे. फलटण, खंडाळा, माळशिरससाठी नीरा देवघर धरण झालंय तर त्याचा लाभ लाभक्षेत्रालाच मिळावा ही भूमिका आ. रामराजेंची आहे. यात राजकारण कसलं? निरा देवघरला बंदिस्त पाईपलाईनने पाणी देण्याचा निर्णय तसेच या निर्णयामुळे निरादेवघरचं वाचणारं चार टीएमसी पाणी. त्यातील 0.93 टीएमसी पाणी धोम बलकवडीला देऊन त्याची क्षमता वाढवणे. उर्वरित 3.10 टीएमसी पाणी वाटपाचा विचार करताना नीरा देवघरच्या लाभ क्षेत्रात फलटणमधील 58 टक्के क्षेत्रच भिजते. वाचणारे पाणी भिजत नसलेल्या 42 टक्के क्षेत्रासाठी मिळावे. तशाच प्रकारे लाभ क्षेत्रातील अन्य तालुक्यांना तसाच न्याय द्यावा, अशी चर्चा 24 सप्टेंबर 2021 रोजी विधान परिषदेचे तत्कालीन सभापती आ. रामराजे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये झाली होती व निर्णय घेण्यात आला होता. त्या मिटींगला जलसंपदा मंत्री व पुनर्वसन मंत्रीही उपस्थित होते. म्हणजेच नीरा देवघरच्या बंदिस्त पाईपलाईनचा व 0.93 टीएमसी पाणी धोम बलकवडीला देण्याचा निर्णय आ. रामराजेंनी अभ्यास करुन दूरदृष्टीने पूर्वीच घेतलेला असतानाही माजी खासदार ते आम्ही केले असे सांगत सुटलेत.
संजीवराजे पुढे म्हणाले, ज्यांनी प्रकल्पासाठी त्याग केलाय त्यांनाच प्रथम पाण्याचा लाभ मिळावा, ही आमची भूमिका आहे. नीरा देवघर लाभक्षेत्रात 23 हजार हेक्टर क्षेत्र येते. माजी खासदार म्हणतात नीरा उजव्या कालव्यावरून नीरा देवघर लाभक्षेत्रातील वीस हजार हेक्टर क्षेत्र सध्या भिजत आहे. तसं असेल तर आहे हे तसेच ठेवा. पाईपलाईनही काढण्याची गरज नाही. खरंतर हे चुकीचं बोलतात. त्याची त्यांना जाणीव नसावी. माहितीही नाही. काहीतरी बोलत सुटतात. माजी खासदारांनी निरा देवघरच्या वाचणार्या 3 टीएमसी पाण्याचे वाटप माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्याला एक एक टीएमसी द्यावे असे पत्र दिले असल्याचे पुराव्यासह सांगितले. ते अर्थहीन बोलत असतात असाही आरोप त्यांनी केला.
नीरा देवघरचं जास्तीचे पाणी नीरा उजवा व डाव्या कॅनॉलचे लाभार्थीच वापरत होते. ते पाणी लाभ क्षेत्रात गेल्यावर दोन्ही कॅनॉलचे पाणी कमी होणार आहेच. बंदिस्त पाईपलाईनमुळे नीरा देवघरचं वाचणारं पाणी लाभक्षेत्रातच दिलं, तर तेथील सिंचन क्षेत्र 75-80 टक्क्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल व नीरा उजव्या कालव्यावरील उपसा सिंचन कमी होईल. वाचणार्या पाण्याचा योग्य बॅलन्स केला तरच सर्वांना योग्य न्याय मिळणार आहे. नाहीतर तालुक्याचे मोठे नुकसान होणार आहे. वाचणारे पाणी प्रथम लाभक्षेत्रालाच मिळावे त्यातून राहिलेल्या पाण्याचेच इतरांना देण्याचे नियोजन करावे, असेही संजीवराजे म्हणाले.