संग्राम घोरपडे Pudhari File Photo
सातारा

आम्ही बोललो, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही : संग्राम घोरपडे

तुम्ही बिनकामाचे म्हणूनच जनतेने हद्दपार केले

पुढारी वृत्तसेवा

वेणेगाव : ज्यांनी स्वतःच्या राजकीय ताकदीचा दुरुपयोग केला, ज्यांनी वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान बंडा तात्या कराडकर यांना माफी मागायला लावली त्यांची लायकी निवडणुकीत जनतेने दाखवून दिली आहे. ज्यांनी आजपर्यंत आमच्यासह अनेकांवर खोट्या केसेस दाखल केल्या त्यांनी टीका करताना भान ठेवावे. अन्यथा आम्ही बोललो तर समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा पलटवार उद्योजक व युवा नेते संग्राम घोरपडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला.

याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात संग्राम घोरपडे यांनी म्हटले आहे की, आम्ही जिल्ह्यात कोणत्याही काट्यावरून ऊस वजन करून आणल्यास ट्रॅक्टर खाली करून घेतो तसा तुम्ही घेणार का? चोराच्या उलट्या बोंबा कशाला पाहिजेत? दर कमी देतो म्हणता आमची रिकव्हरी सन 2023-24 मध्ये 11.64 आहे. तीच तुमची 12.25 च्या आसपास आहे. आम्ही 13 ते 14 महिन्याचा ऊस गाळतो. मात्र, तुम्ही सभासदांच्या उसात साखर तयार झाल्यानंतर म्हणजेच 18 ते 22 महिन्याचा ऊस गाळता. तुमच्या कारखान्याची वाहतूक ही आमच्या कारखान्यापेक्षा 150 ते 200 रुपयांनी कमी जाते. आमच्या कारखान्याचे वय 6 वर्ष आहे. हे सर्व पाहता आपण किमान 350 रुपये जास्त द्यायला हवे होते. परंतु आपण फक्त आमच्यापेक्षा 49 रुपये जास्त दिले. आम्ही चालू वर्षीचा पहिला हप्ता दिलेला आहे, फायनल बिल अजून दिलेले नाही, असेही घोरपडे यांनी म्हटले आहे.

आपण कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दर जाहीर केलेला आहे. सभासद पूर्ण अभ्यासू आहे. आम्ही ज्या प्रॉपर्टी कमवल्या त्याचा संपूर्ण हिशोब शासनाकडे आहे. परंतु, आपण त्या विभागातील जमिनी खरेदी करण्यासाठी त्या विभागाला पाण्यासाठी वंचित ठेवून उत्तरमध्ये शेकडो एकर जमिनी विविध लोकांच्या नावावर खरेदी केली आहे. ती कोणत्या उद्योगधंद्याच्या जीवावर घेतल्या हे स्पष्ट करा, असे आव्हानही घोरपडे यांनी दिले.

आम्ही उद्योगधंद्यांच्या जीवावर आमची गुंतवणूक करत आहोत. कारखाना कोणाची जाहगिरी नसून तो सभासदांचा कारखाना आहे. आम्ही कारखाना लढवणार नसून कारखान्याचे सभासद निवडणूक लढवणार आहेत. आमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य निवडणुकीस उभा राहणार नाही. पण सामान्य कुटुंबातील सभासद यावेळी चेअरमन होणार आहे. ज्या पद्धतीने विधानसभेला परिवर्तन झाले त्याचप्रमाणे कारखाना निवडणुकीत सभासद परिवर्तन करणार आहेत, असेही घोरपडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, ज्या सभासदांवर अन्याय केला, इतरत्र ऊस घालण्यास भाग पाडले त्यांना माफी मागायला लावली हे सभासद विसरलेले नाहीत. जनतेसाठी तुम्ही बिनकामाचे असल्यानेच हद्दपार झाला. आमचा कारखाना 11 महिन्यात सर्व परवान्यासह उभा राहिला तुम्हाला कित्येक वर्षात विस्तार करता आला नाही. शेजारच्या कारखान्याने 250 कोटीमध्ये 12000 गाळप क्षमतेचे यशस्वी एक्सपान्शन केले. यावरून तुम्ही किती बिनकामाचे आहात हे सिद्ध होते. विधानसभा निवडणुकीमध्ये ट्रेलर बघितला आता कारखान्याच्या निवडणुकीत पिक्चर दाखवणार आहे, असा इशाराही घोरपडे यांनी दिला आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव वापरले त्यांचे विचार कधीच आचरणात आणले नाही. कारखाना कार्यस्थळावर असणारा त्यांचा धूळखात पडलेला पुतळा हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आमदारकी व मंत्रिपदाचा वापर करून आमच्यावर खोट्या केसेस दाखल करून त्रास देवून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. याची मतदारसंघाला जाण आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे न्यायालय त्याच्यावर न्याय देईलच परंतु आपण न्यायाधीश झाल्यासारखे बोलू नका, अशी टीका घोरपडे यांनी केली आहे.

वैफल्यग्रस्त मानसिकतेतून व्यर्थ बडबड

ऐतिहासिक पराभव झाल्यामुळे तुमचा तोल ढासळला आहे. आपला कोणीही पराभव करू शकणार नाही, आपण जणू ताम्रपट घेऊन जन्माला आलेल्या अविर्भावात आपला अहंकाराचा फुगा फुटला आहे. मात्र, मतदारांनी आपल्याला 44 हजार मतांच्या फरकाने घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आपली बडबड आता मतदारसंघातील कोणीही मनावर घेणार नाही, असा चिमटाही संग्राम घोरपडे यांनी काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT