- उद्धव पाटील
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रस्तावित नवीन मुख्यालय इमारतीला ग्रँड लूक मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मुख्यालय इमारत भव्य-दिव्य, आकर्षक दिसली पाहिजे. इलेव्हेशन हटके तयार करा, त्यासाठी नवीन चार-पाच डिझाईन तयार करा, असे त्यांनी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत सांगितले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नवीन मुख्यालय इमारतीसाठी तीन डिझाईन तयार केली. त्यांचे प्रेझेंटेशन सादर करण्यासाठी मंत्रालयात दोनदा बैठकाही आयोजित करण्यात आल्या. मात्र दोन्ही वेळी काही कारणांमुळे बैठक लांबणीवर पडली. बुधवार, दि. 28 जानेवारीरोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. महापालिकेतही शोककळा पसरली. आता महापालिकेची नवी इमारत ग्रँड लूक असणारी होईल का, असा प्रश्न अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला.
पाच-सहा महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिकेच्या प्रस्तावित योजनांचे प्रेझेंटेशन सादर केले होते. त्यामध्ये महापालिकेच्या प्रस्तावित नवीन मुख्यालय इमारतीचाही समावेश होता. या इमारतीसाठी 81 कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी आयुक्त गांधी यांनी केली होती. त्यावेळी महापालिकेचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण हेही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इमारतीचा नकाशा पाहिला. महापालिकेच्या नवीन मुख्यालयाला ग्रँड लूक पाहिजे. इमारत आकर्षक दिसली पाहिजे. इलेव्हेशन उठावदार असले पाहिजे. त्यासाठी चार-पाच डिझाईन तयार करा, मला दाखवा, निधी कमी पडू देणार नाही, असे अजित पवार म्हणाले होते.
त्यावर महापालिका प्रशासनाने विभागनिहाय इमारतीची रचना, सुविधा आणि सौंदर्य यांचा समन्वय साधून तिला भव्य रूप देणारे डिझाईन तयार केले. आयुक्त गांधी यांनी उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला. मंत्रालयात दोनदा बैठकीचे आयोजनही झाले. पण बैठक लांबणीवर पडत गेली. बुधवारी अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या स्वप्नातील ग्रँड लूक असणारी महापालिका मुख्यालयाची इमारत साकारणे आवश्यक आहे.