सातारा, पुढारी वृत्तसेवा : वडूथ (ता. सातारा) येथे वाळू चोरी प्रकरणातून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना सातारा जिल्हा न्यायालयात शिक्षा ठोठावण्यात आली. कुर्हाड, लाकडी दांडके, लोखंडी गज या शस्त्राने जबर दुखापत केल्याची घटना 2015 साली घडली होती.
विजय शिवराम साबळे (वय 52), सुदाम शिवराम साबळे (वय 50), अनिल सुदाम साबळे (वय 39 सर्व रा. वडूथ) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राहुल मधुकर साबळे (वय 30, रा.वडूथ) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 14 नोव्हेंबर 2015 रोजी वडूथ येथे घडली होती. तक्रारदार राहुल साबळे यांना संशयितांनी 'तू आमचा वाळू व्यवसाय व साठा करण्यास आडवा आला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,' असे म्हणत दमदाटी केली. याच बाचाबाचीतून तक्रारदार, त्यांचे वडील व भावावर सशस्त्र हल्ला केला.
या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर सातारा तालुका पोलिस ठाण्यात जिवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तत्कालीन फौजदार पी. बी. कदम यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायालयात याप्रकरणी 11 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. एल. के. खाडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधिश मंगला धोटे यांनी आरोपींना 4 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.